रवींद्र माने स्वगृही परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 02:32 PM2017-10-09T14:32:51+5:302017-10-09T14:53:29+5:30
पूर्वीचे शिवसेनेचे रत्नागिरीचे पालकमंत्री आणि नंतर राष्ट्रवादीत गेलेले रवींद्र माने शिवसेनेत परत गेले आहेत. आज सोमवारी दुपारी मातोश्रीवर शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले.
रत्नागिरी,9 : पूर्वीचे शिवसेनेचे रत्नागिरीचे पालकमंत्री आणि नंतर राष्ट्रवादीत गेलेले रवींद्र माने शिवसेनेत परत गेले आहेत. आज सोमवारी दुपारी मातोश्रीवर शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे स्वागत केले.
१९९0 साली संगमेश्वर विधानसभा मतदार संघात रवींद्र माने प्रथम आमदार झाले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची त्यावेळी देवरूखला जंगी सभा झाली होती. त्यानंतर १९९५ साली ते पुन्हा निवडून आले. त्यावेळी राज्यात युतीची सत्ता आली आणि मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात नगरविकास राज्यमंत्री म्हणून रवींद्र माने यांची निवड झाली.
रत्नागिरीचे पालकमंत्रीपदही त्यांना देण्यात आले. जोवर मनोहर जोशी मुख्यमंत्री पदावर होते, तोपर्यंत माने पालकमंत्री होते. व्यासप्रकरणी मनोहर जोशी यांच्याबरोबरच माने यांनाही पद सोडावे लागले. १९९९च्या विधानसभा निवडणुकीत सुभाष बने यांनी बंडखोरी केलेली असतानाही रवींद्र माने तिसºयांदा विजयी झाले.
२00४ मध्ये मात्र संगमेश्वर विधानसभा मतदार संघात रवींद्र माने यांच्याजागी सुभाष बने यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. तेव्हापासून माने नाराज होते. २0१0 मध्ये त्यांनी शिवसेना सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत रत्नागिरीच्या गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या पटांगणावर झालेल्या कार्यक्रमात माने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
राष्ट्रवादीत गेल्यानंतर माने यांनी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. गेले वर्षभर ते शिवसेनेत जाणार असल्याची चर्चा होती. ते एकदा मातोश्रीवर जाऊन पोहोचलेही होते. मात्र त्यावेळी प्रवेश झाला नाही. त्यावेळी हुकलेला मुहूर्त आज साधला गेला. दुपारी शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.
शिवसेनेचा हेतू काय?
पक्षापासून लांब गेलेल्या जुन्या नेत्यांना परत पक्षात घेण्यामागे शिवसेनेचा काय हेतू आहे, याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. कोकणचे नेते नारायण राणे यांनी स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतर शिवसेनेला धक्का देण्याचा मुद्दा उघडपणे मांडला आहे. त्यामुळे शिवसेनेने पक्ष मजबूत करण्यासाठी जुन्या नेत्यांना सन्मानाने पक्षात घेण्याची तयारी दर्शवली आहे, असे राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे.