जिल्हा परिषदेत शिवसेनेच्या प्रतोदपदी रचना महाडिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:29 AM2021-03-25T04:29:38+5:302021-03-25T04:29:38+5:30
रत्नागिरी : जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या पक्षप्रतोदपदी माजी अध्यक्षा रचना महाडिक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ...
रत्नागिरी : जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या पक्षप्रतोदपदी माजी अध्यक्षा रचना महाडिक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या इतिहासामध्ये प्रथमच एखाद्या पक्षाच्या नेतेपदी महिला सदस्याची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
उच्चशिक्षित आणि अभ्यासू जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून रचना महाडिक यांची गणना करण्यात येते. शास्त्र शाखेच्या पदवीधर असलेल्या रचना महाडिक यांच्या घरात राजकीय वातावरण असले तरी त्यांना स्वत:ला राजकारणाचा अनुभव नव्हता. त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश केला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्या त्या पत्नी आहेत. ३० नोव्हेंबर २००९ ते ११ मे २०११ या कालावधीत त्या जिल्हा परिषद अध्यक्ष होत्या. त्यांची प्रशासकीय कामकाजावर घट्ट पकड होती. आजही त्या सभागृहात कार्यरत आहेत.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत रचना महाडिक यांनी जिल्ह्यात जागतिक महिला दिन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संगमेश्वरात साजरा केला. या महिला दिनासाठी शिवसेना नेत्या आमदार व विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे या आवर्जून उपस्थित राहिल्या होत्या. या मेळाव्याला जिल्हाभरातून हजारो महिला उपस्थित राहिल्या होत्या. जिल्ह्यातील एवढा मोठा महिला मेळावा प्रथम त्यावेळी घेण्यात आला होता. सध्या त्या जिल्हा परिषदेची स्थायी समिती, जलव्यवस्थापन समितीवर सदस्य आहेत. तसेच जिल्हा नियोजन मंडळाच्याही त्या सदस्य आहेत.