landslides collapsed: दरड कोसळल्याने रघुवीर घाट बंद, वीस गावांचा संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 04:45 PM2022-07-30T16:45:15+5:302022-07-30T17:10:23+5:30
या महिन्यात दुसऱ्यांदा रघुवीर घाटात दरड कोसळली
खेड : तालुक्यातील रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटात शनिवारी पहाटेच्या सुमारास डोंगराचा कडा रस्त्यावर कोसळल्याने वाहतूक बंद झाली आहे. घाट रस्ता बंद झाल्याने कांदाटी खोऱ्यातील सुमारे वीस गावांचा संपर्क तुटला आहे. या महिन्यात दुसऱ्यांदा रघुवीर घाटात दरड कोसळली आहे.
घाटात दरड काेसळल्याची माहिती मिळाल्यानंतर याठिकाणी जेसीबीसह अन्य सामुग्री घेऊन बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झालेले आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या उपअभियंता आशा जाटाळ यांनी दिली. पहाटेच्या सुमारास या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे आकल्पे येथे वस्तीला असलेली आकल्पे - खेड ही एसटी बस पलीकडे अडकून पडली आहे. त्यामुळे शनिवारी कामानिमित्त खेड शहरात येणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
रघुवीर घाटात दरड कोसळल्यामुळे महाबळेश्वर तालुक्यातील शिंदी, वळवण, उचाट, मोरणी, म्हाळुंगे, सालोशी, खांदाट, वाघावळे, लामज, निवळी, परबत, बन, चकदेव, आकल्पेसह अन्य गावांकडे जाण्याचा मार्ग सद्यस्थितीत बंद झाला आहे. ही कोसळलेली दरड मोठी असून, ही दरड काढून रात्री उशिरा रस्ता मोकळा होईल, अशी माहिती शिंदी -वळवण येथील ग्रामस्थ सदानंद मोरे यांनी दिली.