कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रघुवीर घाट पर्यटकांना बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:42 AM2021-06-16T04:42:32+5:302021-06-16T04:42:32+5:30
खेड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी होणारा तालुक्यातील रघुवीर घाट पर्यटनासाठी बंद करण्याचे ...
खेड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी होणारा तालुक्यातील रघुवीर घाट पर्यटनासाठी बंद करण्याचे आदेश खेडचे प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांनी दिले आहेत.
तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या गेले दोन महिने नियंत्रित होत नसल्याने संभावित गर्दी होण्यासारखी ठिकाणे प्रतिबंधित करण्यात येत आहेत.
खेड तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना निदर्शनास येत आहे. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार रोखणे आणि त्यासाठी ठोस उपाययोजना हाती घेणे आवश्यक आहे.
खेड तालुक्यातील खोपी शिरगाव येथील रघुवीर घाट येथे सद्यस्थितीत पावसाळा सुरू झाला असल्याने पर्यटनस्थळ म्हणून पर्यटकांची गर्दी होत असल्याचे दिसून येते.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर लोक गर्दी करून एकत्रित आल्याने सदर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर येथील उपविभागीय
अधिकारी अविशकुमार सोनोने यांनी सोमवारी १४ जून रोजीच्या आदेशानुसार खोपी शिरगाव येथील रघुवीर घाट हा पुढील एक महिना पर्यटनासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या घाटातील हॉटेल
सील करून कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचा आदेश खोपी ग्रामपंचायत कार्यालयाला दिला आहे.