‘रघुवीर’ला मोठी पसंती

By Admin | Published: August 31, 2014 12:31 AM2014-08-31T00:31:23+5:302014-08-31T00:35:16+5:30

पर्यटकांची भेट : धबधबे, लाल खेकडे खास आकर्षण

'Raghuvir' likes big | ‘रघुवीर’ला मोठी पसंती

‘रघुवीर’ला मोठी पसंती

googlenewsNext

सुभाष कदम ल्ल चिपळूण
खेड तालुक्यातील खोपी शिरगावच्या डोंगर माथ्यावर रघुवीर घाट दिमाखात उभा आहे. रत्नागिरी व सातारा जिल्ह्याच्या सीमारेषेवर असलेला हा रखवालदार पर्यटकांची खास आकर्षण आहे. मौजमज्जा करण्यासाठी व निसर्गाचा मनमुराद आस्वाद लुटण्यासाठी एकदा तरी रघुवीर घाटात जायला हवेच.
एका बाजूला कोयना खोरे, घनदाट जंगल तर दुसऱ्या बाजूला डोंगरउतार असलेल्या रघुवीर घाटाचा काही भाग सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट झाला आहे. त्यामुळे या घाटाचे आणखी महत्त्व वाढले आहे. पश्चिम घाटात समाविष्ट असलेल्या सह्याद्रीमध्ये अनेक औषधी वनस्पती व विविध प्रकारची जैवविविधता आहे. येथील घाटात फिरताना त्याची प्रचिती येते. उंचच उंच कडे, त्यावर पडणारे धुके आणि आकाशाला गवसणी घालणारे ढग, हिरवाईने नेटलेले डोंगर काळ्याकभिन्न कड्याकपाऱ्या पाहिल्यावर आपण स्वर्गात तर नाही ना, असा भास होतो. निसर्ग सौंदर्याचे अनोखे दर्शन येथे घडते.
समुद्रसपाटीपासून ७६० मीटर उंची असलेल्या रघुवीर घाटाची रत्नागिरी जिल्ह्यातील लांबी ११ हजार ५०० किलोमीटर आहे. खोपी, शिंदी, वळवण, बामणोलीमार्गे तापोळाकडून फेरीबोटीने पर्यटकांना महाबळेश्वरला जाता येते. महाबळेश्वरला जाण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे. निसर्ग पर्यटन करताना विविध प्रकारचे पक्षी, त्यांचे आवाज, विविध प्रकारचे लहान-मोठे प्राणी, सरपटणारे प्राणी, वाऱ्याचा सळसळणारा आवाज कानात घुमत असतो. हे सारेच अद्भूत आणि मनाला संजीवनी देणारे वाटते. येथे लाल रंगाच्या खेकड्यांना राजू म्हणतात. हे छोटे छोटे चिटुकले राजू पकडताना विलक्षण मजा येते.
रघुवीर घाटात अनेक लहान मोठे धबधबे उंच कड्यावरुन उड्या घेत असतात. पांढऱ्या शुभ्र दुधाच्या धारा अंगावर पडाव्यात, तसे धबधब्याचे पाणी पडत असते. त्याचे तुषार अंगावर उडाले की मन मोहरुन जाते. रघुवीर घाटात असे लहान मोठे अनेक धबधबे लक्ष वेधून घेतात आणि भिजल्याशिवाय राहवत नाही. पाण्यात चिंबचिंब भिजताना अनोखा आनंद मिळतो.
घाटात वाहन चालवितानाही पुरेशी काळजी घ्यावी लागते. अनेकवेळा रस्त्यावर दरड येते किंवा झाडे कोसळलेली असतात. त्यामुळे सतर्क राहणे गरजेचे असते. स्वच्छ, सुंदर व निसर्गाचा निखळ आनंद लुटतानाच मनोरंजनासाठी एकदा तरी रघुवीर घाटाला भेट द्यायलाच हवी.
विहंगम अन् विलोभनीय...
हिरवाईने नटलेल्या डोंगरावर विविध रंगी पशुपक्षी.
माकडापासून मात्र सावधान.
काळ्या कातळावर घडते लाल खेकड्यांचे दर्शन
डोंगर, दऱ्यातून घोंगावणारा वाऱ्याचा आवाज ह्रदयात धडकी भरतो
डोंगर पायथ्याशी असलेला जलसाठ्याने खुलते सौंदर्य.

Web Title: 'Raghuvir' likes big

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.