खेड-कुळवंडी येथे हातभट्टीवर धाड, अडीच लाखांचा माल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:38 AM2021-09-04T04:38:06+5:302021-09-04T04:38:06+5:30
चिपळूण : राज्य उत्पादन शुल्क विभागाने खेड तालुक्यातील कुळवंडी येथे हातभट्टीवर कारवाई केली. या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ...
चिपळूण : राज्य उत्पादन शुल्क विभागाने खेड तालुक्यातील कुळवंडी येथे हातभट्टीवर कारवाई केली. या ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने २ लाख ५१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त कांतीलाल उमाप यांचे निर्देशानुसार रत्नागिरी जिल्ह्यात विभागीय उपआयुक्त वाय. एम. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक सागर धोमकर यांनी हातभट्टी निर्मूलन मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत खेड-कुळवंडी येथे हातभट्टी सुरू असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार उपअधीक्षक व्ही. व्ही. वैद्य यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण व खेड कार्यालयाच्या भरारी पथकाने संयुक्तपणे धाड टाकली. यावेळी कुळवंडी येथील शंकराच्या मंदिराजवळ खोल दरीत हातभट्टी निर्मितीसाठी आवश्यक असे रसायन साठवून ठेवलेल्या ५०० लिटर मापाच्या जवळपास १८ टाक्या मिळून आल्या. त्याठिकाणी गावठी दारू व रसायन असा मिळून २ लाख ५१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याठिकाणी दारू निर्मितीसाठी लागणारे जवळपास ९९०० लीटर रसायन आढळले. कारवाईसाठी पथके येताच आरोपी पसार झाले. त्यामुळे घटनास्थळी कोणताही व्यक्ती आढळलेली नाही.
या मोहिमेत जिल्हा निरीक्षक शरद जाधव, दुय्यम निरीक्षक पी. एल. पालकर, किरण पाटील, निखिल पाटील, सहायक दुय्यम निरीक्षक भालेकर, जयसिंग खुटावळे, गणेश नाईक, महादेव आगळे, जवान विशाल विचारे, अनुराग बर्वे यांचा सहभाग होता.