खेडमध्ये गावठी दारूधंद्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:37 AM2021-07-14T04:37:14+5:302021-07-14T04:37:14+5:30
खेड : तालुक्यातील मुळगाव मराठी शाळेजवळ बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर येथील पोलिसांनी शनिवारी ...
खेड : तालुक्यातील मुळगाव मराठी शाळेजवळ बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर येथील पोलिसांनी शनिवारी सायंकाळी धाड टाकली. या धाडीत २५ हजार ६५० रूपयांचे साहित्य पोलिसांनी जप्त केले असून, याप्रकरणी एकाला ताब्यात घेतले आहे.
अनंत बाबू वारेकर (५५, रा. मूळगाव) असे ताब्यात घेतलेल्या दारू विक्रेत्याचे नाव आहे. तो अवैधपणे दारूची विक्री करत असल्याची कुणकूण लागताच जिल्हा पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकिरण काशिद, पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे व पथकाने सापळा रचला. त्यानुसार टाकलेल्या धाडीत ८४५ लीटर दारूचा साठा पोलिसांनी हस्तगत केला. ही दारू त्याने चिपळूण- काशीमठ येथील पेडणेकर याच्याकडून आणल्याचे पुढे आले आहे. त्यानुसार पेडणेकर याचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. या धडक कारवाईने बेकायदेशीररित्या दारूची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.