रायगडातील मुस्लिमांनी मला मराठीत कुराण दिले हेच आमचे हिंदुत्व : उद्धव ठाकरे

By मनोज मुळ्ये | Published: February 5, 2024 01:56 PM2024-02-05T13:56:10+5:302024-02-05T13:56:25+5:30

''‘त्यांची' चौकशी करुन दाखवा'

Raigad Muslims gave me Quran in Marathi is our Hindutv says Uddhav Thackeray | रायगडातील मुस्लिमांनी मला मराठीत कुराण दिले हेच आमचे हिंदुत्व : उद्धव ठाकरे

रायगडातील मुस्लिमांनी मला मराठीत कुराण दिले हेच आमचे हिंदुत्व : उद्धव ठाकरे

राजापूर : रायगडातील मुस्लिमांनी मला मराठीत कुराण दिले हेच आमचे हिंदुत्व आहे. त्यामुळे आमच्या हिंदुत्वावर कोणीही शंका घेऊ नये, असे सांगत माझे मोदींशी कोणत्याही प्रकारचे वैर नाही, ते मला मानत असतील तर त्यात माझा दोष नाही, असे प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजापूर येथील सभेत बोलताना केले.

राजापूर शहरातील जवाहर चौकात आज, साेमवारी सकाळी त्यांनी जनसंवाद सभा घेतली. यावेळी व्यासपीठावर रश्मी ठाकरे, खासदार विनायक राऊत, राजापूरचे आमदार राजन साळवी, कुडाळचे आमदार वैभव नाईक, माजी आमदार गणपत कदम व अन्य पदाधिकारी उपस्थित हाेते.

ठाकरे पुढे म्हणाले की, संकट काळात राजन साळवींनी जी साथ दिली आहे, त्यामुळे मला राजन साळवींचा अभिमान आहे. राजन साळवींवर सध्या सुडाच्या राजकारणातून लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाची कारवाई सुरु आहे. त्याचा तपास करणारे अधिकारी सुशांत चव्हाण यांनी साळवी यांच्या घराची झडती घेतली. या झडतीनंतर सुशांत चव्हाण यांनी शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत पाच हजार केली आहे. कुणाची किंमत करताय तुम्ही, असा प्रश्न त्यांनी केला. तुमच्या सात पिढ्या संपल्या तरी याची किंमत तुम्ही फेड करु शकत नाही, असेही त्यांनी ठणकावले.

मी लढायला उभा आहे तो माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी असेही ठाकरे यावेळी म्हणाले. जात, पात, धर्म सगळं विसरुन एकत्र येऊया व देशावरचे संकट दूर करुया. तरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय असे म्हणण्याचा अधिकार राहिल, असे ठाकरे यांनी सांगितले.

‘त्यांची' चाैकशी करुन दाखवा

तुम्ही राजन साळवींवर कुणाची तरी तक्रार आली म्हणून कारवाई करत आहात. मग राजापुरात सध्या इच्छुक उमेदवार म्हणून जे पैसे खर्च करतायत त्यांची चौकशी करुन दाखवा, असे आव्हानही दिले.

Web Title: Raigad Muslims gave me Quran in Marathi is our Hindutv says Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.