रत्नागिरीत विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2022 02:05 PM2022-10-22T14:05:31+5:302022-10-22T14:05:59+5:30
दिवाळी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची उडाली धावपळ
रत्नागिरी : पाऊस जाणार, जाणार असे सांगितले जात असतानाच पावसाचा मुक्काम आणखी वाढला आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत कडकडीत ऊन पडलेले असतानाच सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे साऱ्यांचीच त्रेधातिरपीट उडाली होती. जिल्ह्यातील रत्नागिरी, लांजा, चिपळूण, खेड परिसरात पावसाने हजेरी लावली होती.
परतीचा पाऊस जिल्ह्यात सातत्याने हजेरी लावत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ४३०६.२२ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. पावसामुळे तयार झालेले भात, नाचणी कापणी करण्यास समस्या निर्माण होत आहे. काही शेतकरी सकाळी कापलेले भात सायंकाळी घरी आणत आहेत. वाळविण्यास ठेवलेले भात शेतातच भिजत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शुक्रवारी सकाळी कडकडीत ऊन होते.
सहामाही परीक्षेचा शेवटचा पेपर झाल्याने काहीजण मुलांसह खरेदीसाठी बाजारात गेले होते. मात्र, अचानक आलेल्या पावसामुळे साऱ्यांची धावपळ उडाली. बाजारात फटाके, फराळ, रांगोळी, पणत्या, आकाशकंदील विक्रीसाठी लावलेले स्टॉल प्लास्टिक टाकून झाकण्यात आले. प्लास्टिक बंदी असल्याने आकाशकंदील, फटाके, कपडे व अन्य साहित्य ठेवण्यासाठी कापडी पिशव्यांचा वापर केला जात आहे. त्यामुळे वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी ग्राहकांची घाई उडाली होती. दोन तासांनंतर पाऊस थांबला तरी ढगाळ हवामान असल्याने पाऊस पुन्हा येण्याची शक्यता असल्याने अनेक ग्राहकांनी बाजारातून काढता पाय घेतला.