पावसाचा जोर कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:37 AM2021-09-24T04:37:43+5:302021-09-24T04:37:43+5:30
रत्नागिरी : पावसाचा जोर अजूनही कायम आहे. गुरुवारी सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सायंकाळी शिडकावा केला. उत्तर रत्नागिरीत रात्रीपासून पावसाचे ...
रत्नागिरी : पावसाचा जोर अजूनही कायम आहे. गुरुवारी सकाळपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सायंकाळी शिडकावा केला. उत्तर रत्नागिरीत रात्रीपासून पावसाचे प्रमाण वाढले आहे. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ६०० मिलिमीटर (सरासरी ६६.७८ मिलिमीटर) पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात झाली आहे. काही किरकोळ पडझडीच्या घटनाही घडल्या आहेत.
हवामान खात्याने २६ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. सध्या जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस कमी-जास्त प्रमाणात सुरू आहे. बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला असून, उर्वरित रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तालुक्यांमध्ये पावसाचे कमी प्रमाण नोंदविले आहे. गुरुवारी सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, सायंकाळनंतर पुन्हा जोर घेतला.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडे आलेल्या सकाळी १० वाजेपर्यंतच्या नुकसानाच्या अहवालानुसार, दापोली तालुक्यातील हर्णे येथील कल्पना कातेकर यांच्या घराचे पावसामुळे अंशत: नुकसान झाले आहे. संगमेश्वर तालुक्यातील किरबेट येथील सुनीता बागवे यांच्या गोठ्याचे अंशत: नुकसान झाले आहे. तसेच रत्नागिरीतील नारायण कुरधुंडकर यांच्या घराचेही नुकसान झाले आहे.