चिपळुणात चितेवर पडला पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:31 AM2021-05-16T04:31:05+5:302021-05-16T04:31:05+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : बाजारपेठेतील एकमेव असलेल्या रामतीर्थ स्मशानभूमीतील शेड दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसामुळे हे ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : बाजारपेठेतील एकमेव असलेल्या रामतीर्थ स्मशानभूमीतील शेड दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. पावसामुळे हे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी होत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशातच शनिवारी उजाड स्मशानभूमीत चितेला अग्नी देऊन काही वेळ झाल्यानंतर येथे पाऊस पडला. त्याने अग्नी विझल्याने या प्रकाराविषयी नाराजी व्यक्त केली.
चिपळूण शहरातील रामतीर्थ स्मशानभूमीत सध्या कोरोनाबाधित मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगा लागत आहेत. नगर परिषदने रामतीर्थ स्मशानभूमी व्यवस्थापनाची जबाबदारी ग्रामदैवत श्री जुना कालभैरव देवस्थान ट्रस्टला दिली आहे. सद्य:स्थितीत रामतीर्थ स्मशानभूमीतील पत्र्याची शेड काढली आहे. पावसाळा तोंडावर आहे. त्यातच हवामान खात्याने १५ ते १८ मे दरम्यान वादळाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने रामतीर्थ स्मशानभूमीतील पत्राच्या शेडकडे गांभीर्याने लक्ष देऊन ती तातडीने उभारण्याची मागणी अनेकांनी नगर परिषदेकडे केली आहे. मात्र, आजतागायत त्याकडे नगर परिषदेने दुर्लक्ष केले.
सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे या स्मशानभूमीत दररोज सरासरी पाच मृतदेहांवर अग्नी दिला जातो. शुक्रवारी सात, तर शनिवारी तीन मृतदेहांना अग्नी देण्यात आला. मात्र, सायंकाळी शहरातील राधाकृष्णनगर येथील एका मृतदेहाला अग्नी दिल्यानंतर काही वेळातच जोरदार पाऊस सरू झाला. यामध्ये अर्धवट जळलेल्या सरणावर उपाययोजना करताना कामगारांची तारांबळ उडाली. मात्र, काही वेळातच पाऊस थांबल्यामुळे पुन्हा अग्नी देण्यात आला. या प्रकाराविषयी राधाकृष्णनगरमधील संदीप चिपळूणकर यांच्यासह अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
--------------------------
रामतीर्थ स्मशानशेड धोकादायक बनली होती. उत्तर प्रदेशमध्ये स्मशानशेड कोसळून काहीजण मृत्युमुखी पडले होते. त्या घटनेची दखल घेऊन ही शेड बांधण्यात आली. मात्र, आता या कामाची फेरनिविदा काढली असून, त्याला दोन दिवसांची मुदत आहे. या प्रक्रियेनंतर तातडीने हे काम मार्गी लावले जाणार आहे.
- डॉ. वैभव विधाते, मुख्याधिकारी, चिपळूण.
---------------------------
चिपळूण नगर परिषदेने रामतीर्थ स्मशानभूमी येथील शेड काढल्याने शनिवारी पावसाळमुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना अडचण आली़