पावसाने गारठवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:36 AM2021-08-20T04:36:33+5:302021-08-20T04:36:33+5:30
रत्नागिरी : गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा वाढला आहे. सध्या पाऊस सरींवर असला तरीही येणारी सर जोरदार असून ...
रत्नागिरी : गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा वाढला आहे. सध्या पाऊस सरींवर असला तरीही येणारी सर जोरदार असून दिवसभर पावसाळी वातावरण कायम आहे. त्यामुळे या पावसाने नागरिकांना चांगलेच गारठवले आहे. सध्या तापमान २६ अंशापर्यंत पोहोचले असून वाऱ्यामुळे गारठाही वाढला आहे.
२० ते २२ जुलै या कालावधीत जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. या पावसाने जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. चिपळूण, खेड या तालुक्यांना याचा फटका सर्वाधिक बसला. त्यानंतर पावसाने विश्रांती घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर ऊन-पावसाचा खेळ सुरू होता. मात्र, श्रावण महिना सुरू होताच पावसाचे प्रमाण वाढले आहे. सरी अधूनमधून पण जोरदार कोसळत आहेत. दिवसभर पावसाळी वातावरण कायम आहे.
गेल्या अडीच महिन्यात वार्षिक सरासरीच्या ८५ टक्के इतका पाऊस झाला आहे. हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यातही काही ठिकाणी अजूनही मुसळधार पाऊस पडणार आहे. सध्या पावसाच्या सरी जोरदार पडत असल्याने वातावरणात चांगलाच गारठा निर्माण झाला आहे. सध्या रत्नागिरीत कमाल तापमान २७ अंशावर घसरले आहे तर किमान तापमान २४ अंश इतके झाले आहे.
उन्हाळ्यात रत्नागिरीचे तापमान अगदी ३८ अंशापर्यंत पोहोचले होते. त्यामुळे नागरिकांना उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणावर त्रासदायक होत हाेता. मात्र, जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावली. जुलै महिन्याच्या उत्तरार्धात तर पावसाचा जोर अधिकच वाढला होता. ऑगस्ट महिना सुरू होताच पावसाचे प्रमाण कमी झाले होते. परंतु गेल्या तीन चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. रात्रीही ठरावीक सरी पडत असल्या तरीही जोरदार कोसळत आहेत. बुधवारपासून पावसाचा जोर वाढलेला दिसत आहे. दिवसभर पावसाचे वातावरण असल्याने आता वातावरणात चांगलाच गारठा निर्माण झाला आहे.