Rain in Chiplun: चिपळुणात पावसाची मुसळधार! वाशिष्ठी, शिवनदीने गाठली इशारा पातळी
By संदीप बांद्रे | Published: August 7, 2022 04:21 PM2022-08-07T16:21:35+5:302022-08-07T16:23:22+5:30
Rain in Chiplun: गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी पहाटेपासून जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे येथील वाशिष्ठी व शिवनदीनेही इशारा पातळी जवळजवळ गाठली आहे.
चिपळूण - गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने रविवारी पहाटेपासून जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे येथील वाशिष्ठी व शिवनदीनेही इशारा पातळी जवळजवळ गाठली आहे. प्रशासनाने पुन्हा एकदा आपत्ती व्यवस्थापनासह नगर परिषद नियंत्रण कक्षदेखील सज्ज केले आहे. दरम्यान, धोकादायक बनलेल्या परशुराम घाटातील वाहतूक दिवसा सुरुच ठेवली आहे.
मुसळधार पावसामुळे येथील वाशिष्टी व शिवनदी दुथडी भरून वाहत आहे. वाशिष्ठी नदीची समुद्र सापटीपासून ५ मीटर वर असलेली इशारा पातळी जवळजवळ गाठली आहे. बाजारपेठेतील बाजारपुल, नाईक कंपनी, भेंडीनाका, रंगोबा साबळे मार्ग, वडनाका, एकविरा देवी मंदिर, जुना कालभैरव मंदिर रस्ता या परिसरात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे. पहाटे पासून शहर आणि ग्रामीण भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. धो-धो पाऊस पडल्याने शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबले. महामार्गावर डीबीजे महाविद्यालय, तसेच कापसाळ येथे पाणी तुंबले होते. याच पद्धतीने बाजारपेठेतील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर एक ते दीड फूट पाणी साचले आहे. या पाण्यातूनच वाहने काढली जात होती. सलग मुसळधार पाऊस कोसळल्याने नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या दहा दिवसांपासून विश्रांती घेतली होती. या दिवसांत ऊन पावसाचा खेळ सुरू होता. शुक्रवार, शनिवारी तर संपूर्ण दिवस चकाचक ऊन आणि मध्येच पावसाची हलकी सर असे वातावरण होते. परंतु रविवारी पहाटे पासून पावसाने जोरदार सुरुवात केली. काळाकुट्ट अंधार करत व वादळी वाऱ्यासह येथे धो-धो पाऊस पडू लागला. पावसाची तीव्रता क्षणाक्षणाला वाढत गेली. पावसाने अक्षरशः रौद्ररूप दाखवण्यास सुरुवात केल्याने व्यापाऱ्यांसह नागरिक देखील सतर्क झाले आहेत.
सध्या कोयना विद्युत प्रकल्पातील एक टर्बाइन सुरू आहे, अशी माहिती मुख्य अभियंता चोपडे यांनी दिली आहे. साधारण दोन तास वाट बघून ते टरबाइन बंद करण्यात येईल व संध्याकाळी जर पाऊस आटोक्यात असेल तर ते टर्बाइन बंदच राहील, असेही चोपडे यांनी सांगितले. कारण संध्याकाळी भरती असल्याने शक्यतो विसर्ग करण्यात येणार नाही. परंतु जर धरण क्षेत्रात पाऊस खूपच लागला, तर मात्र टर्बाइन चालू ठेवावा लागेल असेही माहिती त्यांनी दिली आहे. सध्या कोळकेवाडी धरण तुडुंब भरलेला असल्याने पाणी टर्बाईन्व्दारे सोडावे लागत आहे. नवजा व पोफळी परिसरात पाऊस खूप आहे, मात्र धरण क्षेत्रात कमी आहे.