पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले; जगबुडी, वाशिष्ठीसह नद्यांचे पाणी वाढल्याने पुर परिस्थिती
By शोभना कांबळे | Published: July 19, 2023 06:06 PM2023-07-19T18:06:11+5:302023-07-19T18:07:00+5:30
काही ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर, चिपळूण व खेड तालुक्यांतील शाळांना सुट्टी
रत्नागिरी : वादळी पावसाने बुधवार सकाळपासून जिल्ह्याला झोडपण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील जगबुडी, गडनदी या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून वाशिष्ठी, अर्जुना, नारिंगी नद्या इशारा पातळी ओलांडून वाहत आहेत. त्यामुळे खेड, चिपळूण, राजापूर, संगमेश्वर या शहरांमध्ये पुराचे पाणी भरले. त्यामुळे काही लोकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. परशुराम घाटातील रस्ता दरड कोसळल्याने वाहतुकीकरीता बंद ठेवण्यात आला असून दरड हटविण्याचे काम सुरू आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस पडण्यास सुरूवात झाली आहे. खेडमधील जगबुडी नदीने बुधवारी धोका पातळी ओलांडून १०.८० मीटरची पातळी गाठली. खेड शहरात अनेक भागात दुपारपर्यंत सुमारे ३ फूट इतके पुराचे पाणी भरले. तेथील दुकानदार यांनी दुकाने बंद करून सुरक्षित ठिकाणी गेले आहेत.
शहरातील काही भागातील तसेच बोरघर, खारी, खांबतळे येथील काही नागरिकांचे स्थलांतर केले आहे. भोस्तेत जगबुडी नदीचे पाणी आल्याने भोस्ते-अलसुरे वाहतूक बंद आहे. नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे चालू आहे. नारिंगी नदीच्या पुरामुळे दापोली खेड रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. काही ठिकाणी झाडे कोसळणे, रस्त्याला भेगा पडण्याच्या घटना घडल्या आहेत. काही गावांचा संपर्क तुटला आहे. खेड शहरात ५ बोटी तैनात करण्यात आल्या असून अलसुरे येथे 1 बोट तैनात करण्यात आली आहे.
चिपळूण तालुक्यातही वशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. शहरातील काही ठिकाणी १ फूटापर्यंत पाणी भरलेले आहे. नगरपालिकेच्या बोटी सांस्कृतिक केंद्र, शंकरवाडी, बाजारपेठ विसर्जन घाट, एस. टी. स्टॅंढ, नगरपालिका कार्यालय अशा ५ ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. एनडीआरएफ, नगरपालिका, पोलिस, तलाठी यांची पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. मिरजोळी जुवाड येथील १९ कुटुंबातील ६५ व्यक्तींना स्थलांतरीत करण्यात आलेले आहे
- कुंभार्ली घाटात दरड कोसळली होती. मात्र, दरड बाजूला करण्यात आली आहे.
- कोकण रेल्वे मार्गावर कोणतीही समस्या नाही. वाहतूक सुरळीत सुरू आहे.
- जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी पूरस्थिती लक्षात घेऊन चिपळूण व खेड या दोन्ही तालुक्यांतील शाळांना सुट्टी दिली आहे.
- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादुरशेख पुलाजवळून एक गाई व एक म्हैस वशिष्ठी नदीत वाहून गेल्या आहेत.
- जुना कॉटेज, भेंडी नाका येथिल ट्रान्सफॉर्मर पुरामुळे बंद करून ठेवल्याने विद्युत पुरवठा बंद आहे.
- संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील मुंबई -गोवा महामार्गावर गडनदीचे पाणी आता धोका पातळीवर आहे. दक्षता म्हणून एक मार्गी वाहतूक सुरू आहे.