जायखेडा परिसरात पाऊस
By admin | Published: April 6, 2016 10:31 PM2016-04-06T22:31:52+5:302016-04-06T22:57:06+5:30
शेतकऱ्यांमध्ये चिंता : कांद्याचे नुकसान होण्याची भीती
जायखेडा : येथील परिसरासह सटाणा तालुक्यातील बहुतांशी भागात बुधवारी सकाळी वादळ व विजेच्या कडकडाटासह तुरळक पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. ढगाळ हवामान वाढल्याने शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच कांद्याचेही नुकसान होणार असल्याची शक्यता काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
संकटांची मालिका पाठ सोडत नसल्याने शेतकरी पुरता धास्तावला आहे. डाळींब व अन्य नगदी पिके आधीच धोक्यात आल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने कांद्याची लागवड केली आहे. कळवण, देवळा, सटाण्यासह मालेगाव तालुक्यात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. महागडे बियाणे घेऊन दुष्काळावर मात करीत कांद्याचे थोडेफार पीक शेतकऱ्यांच्या हाती येणार आहे. त्यातच बाजारभाव गडगडल्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. पाण्याअभावी अनेक शेतकऱ्यांना कांदे सोडून द्यावे लागले आहेत. अशा दुष्टचक्र ात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर पुन्हा अस्मानी संकट घोंगावत आहे. दुष्काळावर मात करीत पिकवलेला कांदा काढणीचे काम सध्या वेगात सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच काढून पडला आहे. वातावरणात बदल होऊन पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. शेतात काढून ठेवलेला कांदा प्लॅस्टिकच्या कागदांनी झाकून पाण्यापासून वाचविण्याचा शेतकरी प्रयत्न करीत आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे कांदे भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. (वार्ताहर)