रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले; खेड, राजापूर, संगमेश्वरात पूरस्थिती, जगबुडी नदीवरील पुलाला भगदाड 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 03:52 PM2024-07-22T15:52:32+5:302024-07-22T15:53:56+5:30

जगबुडी नदीचे पाणी धाेका पातळीच्या वर

Rain lashed Ratnagiri district; Flood situation in Khed, Rajapur, Sangameshwar | रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले; खेड, राजापूर, संगमेश्वरात पूरस्थिती, जगबुडी नदीवरील पुलाला भगदाड 

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले; खेड, राजापूर, संगमेश्वरात पूरस्थिती, जगबुडी नदीवरील पुलाला भगदाड 

रत्नागिरी : जिल्ह्यात संततधार कोसळणाऱ्या पावसाचा शनिवारी मध्यरात्रीपासून जाेर वाढला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. खेड, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यांत पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून, रत्नागिरी तालुक्यातील हरचिरी, चांदेराई बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे.

मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील जगबुडीचे पाणी धाेका पातळीच्या वर पाेहाेचले असून, रविवारी सायंकाळी नदीची पाणीपातळी ९ मीटरपर्यंत हाेती. त्याचबराेबर काजळी नदी (१७.७८ मीटर), अर्जुना नदी (६.३० मीटर), शास्त्री नदी (७ मीटर) आणि मुचकुंदी नदी (४ मीटर)चे पाणी इशारा पातळीच्या वर आले हाेते.

राजापुरातील अर्जुना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने पुराचे पाणी शहरातील शिवाजी पुतळ्यापर्यंत आले हाेते. लांजा तालुक्यातून वाहणाऱ्या काजळी नदीची पाणीपातळी वाढल्याने त्याचा फटका रत्नागिरी तालुक्यातील हरचिरी, चांदेराई, इब्राहिमपट्टणम आणि हातिस या भागाला बसला. हरचिरी आणि चांदेराई बाजारपेठेत पुराचे पाणी शिरल्याने या भागातील वाहतूक बंद पडली हाेती. तसेच संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीचे पाणी वाढल्याने माखजन बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले हाेते. तालुक्यातील अन्य भागांमध्येही रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली हाेती.

चिपळूणमधील वशिष्ठी नदीचे पाणीही सायंकाळी वाढले हाेते. तसेच गुहागर आणि दापाेली तालुक्यांनाही पावसाने झाेडपून काढले. मंडणगड तालुक्यातील भाेळवली लघुपाटबंधारे याेजना पूर्ण क्षमतेने भरल्याने सांडव्यावरून व विमाेचकातून विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. तसेच नगरपंचायत हद्दीतील गांधी चाैक येथील फरशी पुलाजवळील रस्ता खचल्याने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे.

पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू

खेड तालुक्यातील चिंचवली चव्हाणवाडी येथील रामचंद्र सखाराम पवार (६२, रा. चिंचवली, चव्हाणवाडी) हे १८ जुलै राेजी सायंकाळी पाच वाजता प्रात:विधीसाठी नदीवर गेले हाेते. मुसळधार पावसामुळे नदीला आलेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते नदीच्या पाण्यात पडून वाहून गेले. शनिवारी (२० जुलै) दुपारी तीन वाजता त्यांचा मृतदेह बाेरघर - ब्राह्मणवाडी येथे विठ्ठल-रखुमाई मंदिराजवळील नदीकिनारी झुडपात सापडला.

नवीन पुलाला भगदाड

मुंबई-गाेवा महामार्गावरील खेड-भरणे नाका येथील जगबुडी नदीवर बांधलेल्या नवीन पुलाला भगदाड पडल्याचे रविवारी सायंकाळी लक्षात आले. हा प्रकार काही रिक्षाचालकांच्या लक्षात आला. या प्रकारानंतर या ठिकाणी पाेलिस तैनात करण्यात आले असून, मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली आहे.

Web Title: Rain lashed Ratnagiri district; Flood situation in Khed, Rajapur, Sangameshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.