पैशाचा पाऊस; आणखी चौघे अटकेत

By admin | Published: June 5, 2016 10:38 PM2016-06-05T22:38:25+5:302016-06-06T00:52:02+5:30

मंडणगडमधील प्रकार : आणखी काहींचा समावेश असण्याची शक्यता

Rain of money; Four more arrests | पैशाचा पाऊस; आणखी चौघे अटकेत

पैशाचा पाऊस; आणखी चौघे अटकेत

Next

मंडणगड : तालुक्यातील सुर्ले येथे खळबळ उडून देणाऱ्या २५ लाखांच्या पैशाचा पाऊस प्रकरणी आणखी चौघांना अटक करण्यात आली आहे. गेले सहा दिवस पोलिसांचे पथक राज्यातील विविध ठिकाणी या प्रकरणाचा तपास करत होते.
अखेर याप्रकरणी आणखी चौघांना अटक करण्यात आली आहे. फसवूणक करून लाटण्यात आलेल्या मुद्देमालांपैकी काही रक्कमही पोलिसांच्या हाती लागली आहे. या सर्वांना १३ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात जिल्ह्यातील अन्य काहीजणांचा समावेश असण्याची शक्यता आहे.
पैशाचा पाऊस प्रकरणात मुख्य सूत्रधार राजू मारुती पवार (वय ३५, रा. देसगाव, कळवण, जि. नाशिक) याच्यासह मगन रमझोड पवार (३८, जामेद, पो. टिटाणे, ता. साखरी, जि. धुळे) यांना २७ मे २०१६ रोजी लोणावळा येथून यापूर्वीच ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, राज्यातील विविध ठिकाणी तपास करून आणखी चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे याप्रकरणी आतापर्यंत सहाजणांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांमध्ये अतुल शंकर मुणगेकर (३६, ऐरोली, नवी मुंबई) याला मुंबई येथे ताब्यात घेण्यात आले. पंडित ऊर्फ बंटी गंगारा भोये (२४, बोरगाव, ता. सुरगाणा, जि. नाशिक), सुजित अशोक लांमगे (३५, शेंडी ता. अकोले, जि. अहमदनगर), राजेंद्र अकनात बनसोडे (३५, शेंडी, अहमदनगर) यांचा समावेश आहे. त्यांना शनिवारी अटक करून प्रथम मंडणगड येथे आणण्यात आले. त्यानंतर दापोली येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १३ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या सहाजणांविरोधात भारतीय दंड विधान कलम ४०६, ४२०, ५०६-३४ व महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व्याप्ती व प्रारंभ व जादूटोणा प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ चे कलम ३(२) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेसंदर्भात पोलिस निरीक्षक प्रदीप मिसर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक लेखाजी शिंदे, पोलिस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग झोरे, सुरेंद्र सावंत, कमलाकर चौरे, पोलिस कॉन्स्टेबल गणेश सावंत, अशोक चव्हाण, कोलापट्टे यांनी यशस्वी तपास केला.
फसवणुकीचा काही मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात सापडल्याने तपासकामाला वेग आला आहे. या गुन्ह्याच्या मुळाशी जाऊन पर्दाफाश करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)


सुर्ले या गावी जेथे प्रत्यक्षपणे फसवणुकीचे गुन्ह्याला मूर्त स्वरूप देण्यात आले, त्या घटनास्थळी ताब्यात घेण्यात आलेले सहा आरोपी नेमके कसे पोहोचले? त्यांना या ठिकाणाची माहिती कोणी दिली? आरोपींना येथे आणणाऱ्यांचा या गुन्ह्याशी संबंध होता का? याचा शोध आता पोलिस घेत आहेत.
आणखी चौघे ताब्यात?
मंडणगड पोलिसांनी याप्रकरणी आणखी चौघांच्या मुसक्या आवळल्याचे वृत्त आहे. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत पोलिसांनी याबाबत कोणताही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.


हव्यासापोटी अनेकजण पैसे दुप्पट करण्याच्या प्रकाराला बळी पडत आहेत. उच्चवर्गीय लोकांचा यामध्ये सहभाग मोठ्या प्रमाणात असतो. मात्र, फसवणूक झाल्यानंतर बदनामी होण्याच्या भीतीने लोक तक्रार देण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे असे गैरप्रकार करणाऱ्या टोळींचे फावते आणि अशा कृत्यांना बळकटी मिळते. त्यांना शिक्षा मिळण्यासाठी फसवणूक झालेल्या नागरिकांनी तक्रार द्यावी.
- प्रदीप मिसर, पोलिस निरीक्षक, मंडणगड

Web Title: Rain of money; Four more arrests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.