पाऊस, नदीची पातळी कळणार क्लीकवर; रत्नागिरीतील ३ नद्यांवर 'रियल टाइम डेटा सिस्टिम' कार्यान्वित
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 07:03 PM2022-06-15T19:03:18+5:302022-06-15T19:04:55+5:30
पावसाचे प्रमाण वाढल्यास नियंत्रण कक्षामार्फत नागरिकांना सतर्क करणेदेखील आता सोपे व सहज झाले आहे. त्यामुळे नुकसानाची तीव्रता कमी करण्यास या यंत्रणेचा खूप मोठा फायदा होणार आहे.
खेड : जलसंपदा विभागामार्फत कोकणातील नद्यांवर अत्याधुनिक रियल टाइम डेटा सिस्टिम कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे नद्यांमधील पाणी पातळी, पर्जन्यमान यांच्याबाबतचे अचूक आकडे वेगवान पद्धतीने प्रशासनाला उपलब्ध होणार असून, आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने कोकणासाठी ही यंत्रणा महत्त्वाचे काम करणार आहे.
गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड, चिपळूण, राजापूर या ठिकाणी नद्यांना आलेल्या महापुरामुळे मोठी जीवितहानी झाली होती. त्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभाग जल विज्ञान प्रकल्प नाशिकच्या माध्यमातून कृष्णा खोऱ्याच्या धर्तीवर रत्नागिरी जिल्ह्यासाठी रियल टाइम डेटा सिस्टिम कार्यान्वित करण्यात आली आहे.
९ ठिकाणी ए.आर.एस तर ३ ठिकाणी ए.डब्ल्यू.एल.एस सिस्टिम
रत्नागिरी जिल्ह्यात ९ ठिकाणी ए. आर. एस म्हणजेच ॲटोमॅटिक रेन सोर्स स्टेशन आणि तीन ठिकाणी ए डब्ल्यू एल एस म्हणजेच ॲटोमॅटिक वॉटर लेव्हल रेकॉर्ड सिस्टिम बसवण्यात आली आहे. खेडमधील जगबुडी नदी, चिपळूण येथील बहाद्दूरशेख नाका येथील वाशिष्ठी नदी आणि राजापूर येथील अर्जुना नदी या तीन ठिकाणच्या नद्यांवर ही यंत्रणा बसवण्यात आली आहे.
सतर्कतेची सूचना देणे शक्य होणार
जलसंपदा विभागामार्फत एक लिंक देखील देण्यात आली असून, या लिंक वर क्लिक केल्यानंतर जिल्ह्यातल्या तीन नद्यांच्या पाण्याची पातळी आणि नऊ ठिकाणच्या पावसाच्या प्रमाणावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. जलसंपदा विभागामार्फत जिल्ह्यात बसवण्यात आलेल्या या यंत्रणेचा वापर अत्यंत आवश्यक असून, या यंत्रणेमुळे नद्यांची पातळी वाढल्यास नदीच्या आसपासच्या गावांना तत्काळ सतर्कतेची सूचना देणे शक्य होणार आहे. एवढेच नाही तर पावसाचे प्रमाण वाढल्यास नियंत्रण कक्षामार्फत नागरिकांना सतर्क करणेदेखील आता सोपे व सहज झाले आहे. त्यामुळे नुकसानाची तीव्रता कमी करण्यास या यंत्रणेचा खूप मोठा फायदा होणार आहे.