पाऊस सरींवर; नागरिकांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:21 AM2021-07-04T04:21:28+5:302021-07-04T04:21:28+5:30
रत्नागिरी : गेल्या पाच- सहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवार रात्रीपासून जोरदार सरींची सुरुवात केली आहे. अधूनमधून चांगल्या सरी ...
रत्नागिरी : गेल्या पाच- सहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवार रात्रीपासून जोरदार सरींची सुरुवात केली आहे. अधूनमधून चांगल्या सरी कोसळत आहेत. मात्र, अजूनही पावसाचे सातत्य टिकून राहत नसल्याने जिल्ह्यात काही ठिकाणी लावणीची कामे खोळंबली आहेत. मात्र, पाऊस शांतपणे पडत असल्याने जिल्ह्यात पडझडीच्या घटना कुठे घडल्याची नोंद नाही. मात्र, यंदा पावसाने जून महिन्याची सरासरी ओलांडली असून अधिक पाऊस झाला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण ५०.४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाने दमदार सुरुवात केली. त्यामुळे पेरणीच्या कामांना वेग आला. काही ठिकाणी रोपेही जाेमदार आल्याने लावणीला सुरुवात झाली होती. मात्र, गेल्या आठवड्यापासून पाऊस कमी झाला आहे. ऐन लावणीच्या काळात पावसाने पाठ फिरवल्याने लावणीच्या कामात गुंतलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
रत्नागिरीत जून महिन्यात सरासरी ८१८ मिलिमीटर पाऊस पडतो; परंतु गेल्या वर्षी सुरुवातीपासूनच पाऊस कमी झाला होता. त्यामुळे जूनअखेर ७२० मिलिमीटर एवढीच पावसाची नोंद झाली होती. मात्र, यावर्षी जूनअखेरपर्यंत ९०० मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामुळे जून महिन्याच्या सरासरीपेक्षाही यंदा पाऊस १८० मिलिमीटरपेक्षा अधिक झाला आहे. जून महिना संपण्यापूर्वीच सरासरी ओलांडल्यानंतर पुन्हा महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पाच- सहा दिवसांपासून पुन्हा खादी सर वगळता ऊन पडायला सुरुवात झाली होती. पाऊस थांबल्याने उकाड्यालाही सुरुवात होऊ लागली आहे. हवामान खात्याने या आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी होणार असल्याचा अंदाज वर्तविला हाेता. तसेच ९ जुलैनंतर पावसाचा जोर वाढणार असल्याचेही सांगितले आहे.
शुक्रवारी रात्रीपासून पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. शनिवारीही दुपारपर्यंत अधूनमधून जोरदार सरी होत्या. दुपारी काही काळ विश्रांती घेतल्यानंतर सायंकाळी पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली.