रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर; जगबुडीची पाणीपातळी इशारा पातळीवर स्थिर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 12:20 PM2024-06-28T12:20:56+5:302024-06-28T12:21:57+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात पाऊस आता सरींवर पडू लागला आहे. मात्र, दोन दिवस पावसाचा जोर असल्याने खेडमधील जगबुडी नदीची पातळी ...
रत्नागिरी : जिल्ह्यात पाऊस आता सरींवर पडू लागला आहे. मात्र, दोन दिवस पावसाचा जोर असल्याने खेडमधील जगबुडी नदीची पातळी अजूनही इशारा पातळीवर आहे. गुरुवारी सकाळी येथील जिल्हा नियंत्रण कक्षात ६७.६३ मिलीमीटर पावसाची नाेंद झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ७०५ मिलीमीटर पाऊस पडला आहे.
जिल्ह्यात गुरुवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढलेला होता. दुपारच्या सुमारास पावसाचा जोर काहीसा कमी झाला. सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस सरींवर पडत होता. दुपारनंतर मध्येच विश्रांती घेऊन पुन्हा जोरदार सरी येत होत्या. मधूनच सूर्यदर्शनही काही काळ झाले. पावसाचा जोर असल्याने खेड तालुक्यातील जगबुडी नदीचे पात्र अजूनही इशारा पातळीपर्यंत आहे. सायंकाळी पावसाने बराच काळ विश्रांती घेतली होती. त्यानंतर रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता दिसू लागली.
सुरुवातीपासूनच पावसाचा जोर अधिक असल्याने जिल्ह्यातील विविध भागांत घरे, गोठे यांचे नुकसान होत आहे. काही ठिकाणी दरड कोसळणे, रस्ता खचणे आदी घटना वाढू लागल्या आहेत. रत्नागिरी - नागपूर महामार्गाचे काम अर्धवट असल्याने अनेक भागांत रस्त्यालगतची माती रस्त्यावर आल्याने चिखलाचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.