दिलासा! पावसाच्या सरींनी रत्नागिरीकर चिंब, येत्या तीन दिवसात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता
By शोभना कांबळे | Published: September 8, 2023 01:16 PM2023-09-08T13:16:20+5:302023-09-08T13:18:50+5:30
यंदा जुलैचा दुसरा पंधरवडा वगळता पावसाने निराशाच केली
रत्नागिरी : ऑगस्ट महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी (८ सप्टेंबर) सकाळपासून पुन्हा काेसळण्यास सुरूवात केली. पावसाच्या संततधारेने रत्नागिरीकरांना दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, येत्या तीन दिवसात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या चिंतेने ग्रासलेल्या नागरिकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे.
यंदा जुलैचा दुसरा पंधरवडा वगळता पावसाने निराशाच केली आहे. यंदा जून, जुलै महिन्याचे पहिले पंधरा दिवस आणि ऑगस्टमध्ये फारसा पाऊस पडलेला नाही. गेल्या वर्षीही साधारण ३ हजार मिलिमीटर सरासरी एवढा वार्षिक पाऊस पडला हाेता. गेल्यावर्षी जून महिन्याच्या सुरूवातीच्या काळात तसेच ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगली मदत केली होती.
यंदा जूनच्या शेवटी मान्सूनचे आगमन झाले. मात्र, जुलै महिन्याचे १६ - १७ दिवस पावसाची पाठच होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्यातही फारसा पाऊस पडला नाही. त्यामुळे यंदा पाण्याची टंचाई लवकर भासणार असल्याची भीती व्यक्त होत होती. पाऊस गायब झाल्याने उकाड्यालाही सुरूवात होऊ लागल्याने नागरिक हैराण होत होते.
परंतु, एक-दोन दिवसांपासून पावसाच्या सरींना अधूनमधून सुरूवात झाली होती. गुरूवारी सकाळीही चांगल्या सरी पडल्या. शुक्रवारी पहाटेपासून पावसाने अधिकच जोर घेतला. दुपारपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. त्यांनतर थोडी विश्रांती घेतली. मात्र, दिवसभर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता दिसत होती.