वेताळवाडीत पावसाचे पाणी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:42 AM2021-06-16T04:42:27+5:302021-06-16T04:42:27+5:30
खेड : तालुक्यातील चिंचघर- वेताळवाडी येथे खेड दापोली मुख्य मार्गावर रस्त्याच्या गटारांची साफसफाई न झाल्याने पावसाचे पाणी वाहू लागल्याने ...
खेड : तालुक्यातील चिंचघर- वेताळवाडी येथे खेड दापोली मुख्य मार्गावर रस्त्याच्या गटारांची साफसफाई न झाल्याने पावसाचे पाणी वाहू लागल्याने पादचाऱ्यांसहित वाहनचालकांची तारांबळ उडाली.
मान्सूनच्या पावसाची सुरुवात नुकतीच झाली आहे. मात्र, मे महिन्यात आलेल्या तौक्ते वादळाच्या प्रभावाने मेअखेरीस पावसाने जोरदार हजेरी लावली होती. मान्सूनच्या पावसापूर्वी मुख्य रस्त्याच्या गटारांची साफसफाई सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणे आवश्यक होते. मात्र, ही सफाई न झाल्याने खेड-दापोली मार्गावर चिंचघर वेताळवाडी येथे तुंबलेल्या गटारातील पाणी रस्त्यावर येऊन रस्त्याचे रूपांतर ओढ्यात झाल्याचे चित्र दिसत होते.
सखल पातळी आणि साइड पट्टी नसलेल्या रस्त्याच्या या भागात दरवर्षी पाणी तुंबल्यामुळे पावसाची सुरुवात झाल्यानंतर काही दिवसांतच खड्डे पडल्याचे दिसून येते. रस्त्यावर पाणी वाहू लागल्यानंतर दुचाकी वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज घेऊन वाहन चालवावे लागते, तर चारचाकी वाहन शेजारून जाताना अंगावर पाणी उडण्याचे प्रकार घडत असल्याची माहिती दुचाकीस्वारांनी दिली.