जिल्ह्यात पावसाचा राैद्रावतार; ११ सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:37 AM2021-09-08T04:37:55+5:302021-09-08T04:37:55+5:30
रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी जोरदार झालेल्या पावसाने जिल्ह्याला झोडपले. गेल्या २४ तासांत एकूण १४०४.९० मिलीमीटर (सरासरी १५६ ...
रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी जोरदार झालेल्या पावसाने जिल्ह्याला झोडपले. गेल्या २४ तासांत एकूण १४०४.९० मिलीमीटर (सरासरी १५६ मिलीमीटर) पावसाची नोंद झाली आहे. दापोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच ३१५ मिलीमीटर इतका उच्चांकी पाऊस झाला असून, जालगाव भागात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने अनेक भागांत पाणी भरले. चिपळूण बाजारपेठेतही रात्री पुराचे पाणी शिरले. मंगळवारी दिवसभर पावसाचा जोर कायम होता. हवामान खात्याने ७ ते ११ सप्टेंबर या कालावधीत पुन्हा जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे.
पावसाने सोमवारपासून जोर धरला आहे. सायंकाळनंतर पावसाचा जोर अधिकच वाढला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेल्या पावसापैकी सर्वाधिक उच्चांकी पाऊस दापोली तालुक्यात नोंदविण्यात आला असून, त्याखालोखाल चिपळुणात २०८ मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद आहे. मंडणगड (१३२ मिलीमीटर), खेड (१५१.५० मिलीमीटर), गुहागर (१५८.८० मिलीमीटर), संगमेश्वर (१६२.७० मिलीमीटर), रत्नागिरी (१०४.९०) मिलीमीटर, लांजा (१०८ मिलीमीटर) आणि राजापूर (६२.६० मिलीमीटर) या सर्वच तालुक्यांना पावसाने झोडपले आहे. दापोली, चिपळूण या तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने अनेक घरांमध्ये पाणी भरण्याचे प्रकार घडले.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथे वासुदेव हशा देारकूळकर यांच्या मालकीची बोट आंजर्ले खाडीत बुडून पूर्णत: नुकसान झाले आहे. बोटीवरील सहा खलाशी सुखरूप बाहेर आले आहेत. काळकाई येथे प्रकाश साळवी यांच्या घरासमोर आलेले पाणी ओसरले आहे. रूपनगर येथील मनीष जगदीश कदम यांच्या घरासमोर पाणी शिरले. जालगाव समर्थनगर, लष्करवाडी, चैतन्यनगर, भाटकर हॉस्पिटल व ब्राह्मणवाडी गणपती मंदिर परिसरात पाणी शिरले आहे. चिपळूण तालुक्यातील वेलदूर-नवानगर-धोपावे रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली आहे. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरू आहे.
रत्नागिरी शहरानजीकच्या मिरकरवाडा सोमवारी सकाळी जिक्रिया लतिफ पटेल यांच्या मालकीची बोट खडकाला धडकून बोटीचे पूर्णत: नुकसान झाले आहे.