रत्नागिरीत पावसाची गेल्या वर्षापेक्षाही पिछेहाटच
By शोभना कांबळे | Published: September 21, 2023 02:05 PM2023-09-21T14:05:15+5:302023-09-21T14:05:33+5:30
पावसासाठी विघ्नहर्त्याला साकडे
रत्नागिरी : गेल्या तीन दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. मात्र, अजुनही पावसाचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा कमीच आहे. गेल्या वर्षीही पावसाने वार्षिक सरासरी चार महिन्यात ओलांडली नव्हती. मात्र, यंदा गेल्या वर्षीपेक्षाही पाऊस कमी असून वार्षिक सरासरीही पूर्ण करण्याची शक्यता कमी वाटू लागली आहे. सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात पावसाची परती सुरू होते. आतापर्यंत गेल्या वर्षीच्या तुलनेने ९८ टक्के तर वार्षिक सरासरीच्या ८५ टक्केच पाऊस पडला आहे.
यंदा पावसाचे आगमन उशिराच झाले. जून, जुलै महिन्यात पावसाने निराशाच केली. जुलै महिन्याच्या उत्तरार्धात पडलेल्या मुसळधार पावसामुळे दोन महिन्यांची सरासरी पावसाने पूर्ण केली असली तरी आॅगस्ट महिन्यात पुन्हा पावसाचे प्रमाण कमी झाले. आॅगस्ट महिन्यात जवळपास पाऊस झालाच नाही. गेल्या वर्षी पावसाने चार महिन्यांची वार्षिक सरासरी ओलांडली नव्हती. जून ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत केवळ २९९१ मिलीमीटर (८९ टक्के) इतकाच पाऊस पडला होता. गत वर्षी २१ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात २९२१ मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद झाली होती. तर यंदा २८७७ मिलीमीटर सरासरी पाऊस पडला आहे.
सप्टेंबर महिना संपायला जेमतेम आठ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे यावर्षीही पाऊस गेल्यावर्षी प्रमाणेच वार्षिक सरासरी ओलांडण्याची शक्यता कमी झाली आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या` (३३६४.२२ मिलीमीटर) ८५ टक्के (२८७७ मिलीमीटर) इतकाच पाऊस पडला आहे. गणेशाचे आगमन झाल्यापासून म्हणजेच तीन दिवस पावसाने जोरदार फटकेबाजी करायला सुरूवात केली असली तरी मधूनच कडाक्याचे ऊनही पडत आहे. बुधवार आणि गुरूवारी मात्र, पावसाची बऱ्यापैकी संततधार सुरू आहे. रात्री आणि सकाळी पावसाचा जोर चांगला असतो. यामुळे गणेशभक्तांची काहीवेळा अडचण होत असली तरी अजुनही पावसाची गरज असल्याने, पाऊस पडण्यासाठी विघ्नहर्त्याकडेही साकडे घातले जात आहे.
खेडच आघाडीवर
गेल्यावर्षीही याच कालावधीत जिल्ह्यात खेड तालुक्यात सर्वाधिक (३४५० मिलीटर) पाऊस पडला होता. यंदाही सर्व तालुक्यांमध्ये खेडमध्ये सर्वात जास्त ३३४५ मिलीटर पाऊस पडला आहे. अन्य तालुक्यांमध्ये अजुनही पाऊस कमीच आहे.