खेड तालुक्यात पावसाची पुन्हा रिपरिप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:37 AM2021-09-24T04:37:39+5:302021-09-24T04:37:39+5:30
खेड : गेले काही दिवस उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा रिपरिप सुरू केली असल्याने हळव्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण ...
खेड : गेले काही दिवस उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा रिपरिप सुरू केली असल्याने हळव्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्गाच्या अवकृपेने हिरावला जातो की काय या चिंतेने शेतकरी हैराण झाला आहे.
कोकणात हळवी आणि महान अशी दोन प्रकारची पिके घेतली जातात. जी शेती पाणथळ असते त्या शेतीत महान (उशिरा पिकणारी शेती), तर वरकस शेतीमध्ये हळवी (लवकर पिकणारी शेती) केली जाते. पाऊस बेताचा झाला तर हळवी शेती ही गणेशोत्सवादरम्यान काढणीला येते, तर महान शेती काढणीला दिवाळी उजाडते. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण जास्त असल्याने हळव्या शेतीबाबत शेतकरी सुरुवातीपासूनच चिंतेत होता. गणेशोत्सव उरकल्यानंतर लगेच हळव्या पिकाची काढणी करण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली होती; मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा मुसळधार कोसळायला सुरुवात केली असल्याने शेतात पिकलेल्या हळव्या पिकाचे नुकसान होणार, या चिंतेने शेतकरी हवालदिल झाला आहे.
पूर्वी भात, नाचणी, वरी, हरीक, तीळ, उडीद, तूर, चवळी ही कोकणातील प्रमुख पिके होती. येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात ही पिके घेत असत. मात्र अलीकडच्या काळात नाचणी, वरी, हरीक, तीळ, उडीद, तूर, चवळी ही पिके कालबाह्य झाली आहेत. पारंपरिक पद्धतीने शेती करणे परवडेनासे झाले असल्याने कोकणातील शेतकरी अन्य पिके पिकविण्याचा नाद सोडून केवळ भातशेती पिकवत आहे. मात्र, ती शेतीही पावसाच्या लहरीपणाची शिकार होत असल्याने वर्षभर शेतीत काबाडकष्ट करूनही शेतकऱ्यांच्या हाताला फारसे काही लागत नाही.
गेल्या वर्षी पाऊस बेताचा झाल्याने शेतकऱ्याला शेतीतून चार दाणे अधिकचे मिळाले होते. मात्र, यावर्षी सुरुवातीपासूनच जोरदार पाऊस कोसळला असल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत भातशेती वाहून गेल्याने शेतकरी आधीच अडचणीत आला आहे. आता हळवी पिके शेतातून खळ्यात घ्यायची वेळ असताना पुन्हा पावसाने जोरदार कोसळायला सुरुवात केल्याने शेतकऱ्याची चिंता कमालीची वाढली आहे.