रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे सातत्य कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2020 05:34 PM2020-06-18T17:34:38+5:302020-06-18T17:35:41+5:30

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे सातत्य कायम असून, सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू लागला आहे. जिल्ह्यात २४ तासात ११२.७८ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस झाला असून, राजापुरात सर्वाधिक १९० मिलिमीटरची नोंद झाली आहे.

Rains continue in Ratnagiri district | रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे सातत्य कायम

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे सातत्य कायम

googlenewsNext
ठळक मुद्देराजापुरात २४ तासात १९० मिलीमीटरची नोंद अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना

रत्नागिरी : जिल्ह्यात पावसाचे सातत्य कायम असून, सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू लागला आहे. जिल्ह्यात २४ तासात ११२.७८ मिलिमीटर इतका सरासरी पाऊस झाला असून, राजापुरात सर्वाधिक १९० मिलिमीटरची नोंद झाली आहे.

मंगळवारपासून जिल्ह्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. बुधवारीही जोर कायम होता. रात्रीही मेघगर्जना, विजांच्या लखलखाटात पाऊस सुरू होता. या २४ तासात राजापूर, लांजा, रत्नागिरी, दापोली आणि संगमेश्वर या तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. राजापुरात सर्वाधिक १९०, त्याखालोखाल लांजा १४६, रत्नागिरी १३९, दापोली १३० आणि संगमेश्वरमध्ये १०५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. गुहागर, मंडणगड, खेड, चिपळूण येथेही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे.

या पावसाने मंडणगड-दापोली मार्गावरील पिसई गावाजवळ झाड पडले होते. मात्र, ते हटवून वाहतूक सुरळीत केली आहे. या पावसाने संगमेश्वर तालुक्यात अनेक घरांचे नुकसान केले आहे. देवरूख येथील रेश्मा करंडे यांच्या घराचे अंशत: २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. मुचरी येथे महादेव मोरे व केशव मोरे यांच्या घराचे पूर्णत: ३,७२,०२५ रुपयांचे नुकसान झाले आहे. बेलारी येथील आदर्श माध्यमिक विद्यामंदिरची संरक्षक भिंत कोसळल्याने अंशत: ३५,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. माखजन येथे शरद पोंक्षे यांच्या घराजवळील संरक्षक भिंत कोसळली आहे. मावळुंगे येथे किरण ओगले यांच्या घराजवळील संरक्षक भिंत कोसळली आहे. रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या पंडयेवाडी येथील रस्त्यावर शीळ धरणाच्या पाईप लाईनकरिता रस्त्याच्या २ मोऱ्या काढल्याने भगवती मंदिर जवळ पाणी तुंबले होते.

राजापूर तालुक्यातील पेंडखळे येथील सदू म्हादे यांचा गोठा पडल्याने २ बैल जखमी झाले. सुहास म्हादे यांच्या गोठ्याचे अंशत: नुकसान झाले. गुरुवारीही मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सकाळपासूनच सुरूवात झाली असून, या पावसाने वातावरणातील गारठा वाढू लागला आहे.

Web Title: Rains continue in Ratnagiri district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.