रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 02:56 PM2021-07-15T14:56:17+5:302021-07-15T14:57:32+5:30
Rain Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यात गेले पाच दिवस पावसाची संततधार सुरूच आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. राजापूर शहरात बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पुराचे पाणी ओसरले आहे. जिल्ह्यात अनेक भागात पावसाची संततधार सुरूच असली तरी नद्यांची पाणी पातळी वाढलेली नाही.
रत्नागिरी : जिल्ह्यात गेले पाच दिवस पावसाची संततधार सुरूच आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. राजापूर शहरात बुधवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पुराचे पाणी ओसरले आहे. जिल्ह्यात अनेक भागात पावसाची संततधार सुरूच असली तरी नद्यांची पाणी पातळी वाढलेली नाही.
जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ८९.०७ मिलीमीटर तर एकूण ८०१.६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात मंडणगड १०२.१० मिलीमीटर, दापोली ८९.२० मिलीमीटर, खेड ७०.७० मिलीमीटर, गुहागर ९४.८० मिलीमीटर, चिपळूण ७०.४० मिलीमीटर, संगमेश्वर ६७.६० मिलीमीटर, रत्नागिरी ८६.५० मिलीमीटर, लांजा १२०.७० मिलीमीटर, राजापूर ९९.६० मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
जिल्हा नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार दापोली तालुक्यातील मौजे गरदे येथील दापोली ते गरदे चार रस्त्यावरील बाजूची दरड कोसळल्याने वाहतूक बंद झाली आहे. मौजे उजगाव येथील कृष्णा देवजी धोपट यांच्या घराचे अतिवृष्टीने १९,६०० रुपयांचे नुकसान झाले आहे. मौजे उजगाव येथील शंकर जानू गोरे यांच्या घराचे अतिवृष्टीने ८हजार रुपये व जनार्दन देवजी धोपट यांच्या घरामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने अन्न, धान्य, कपडे व घराचे अंशत: २९,५०० रुपये नुकसान झाले आहे.
गुहागर तालुक्यात मौजे वारदई गाव येथील कल्पना कृष्णा जोशी यांच्या घराचे पावसामुळे ३ लाख ५५ हजार रुपये नुकसान झाले आहे. संगमेश्वर मौजे ओझरखोल येथील चंद्रभागा सखाराम लिंगायत यांच्या घराचे पावसामुळे अंशत: २७,६०० रुपये नुकसान झाले आहे.
मौजे कोळंबे येथील विजय महादेव भरणकर यांच्या घराशेजारचा पावसामुळे बांध पडल्याने घराचे अंशत: १० हजार रुपये नुकसान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यातील मौजे भंडारपुळे येथील शैलेश धोंडू सुर्वे यांच्या दोन म्हशी विजेच्या तारेचा शॉक लागून मृत झाल्या आहेत.
वाहून गेलेल्या प्रौढाचा मृतदेह सापडला
राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीच्या पुरात सोमवारी (१२ जुलै) वाहून गेलेल्या प्रौढाचा मृतदेह बुधवारी सायंकाळी पडवे - बाणेवाडी येथे आढळला. हा मृतदेह बेपत्ता सहदेव खेमाजी सोडये (४०, रा. सोडयेवाडी, राजापूर) यांचाच असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी ओळखले असल्याची माहिती नाटे सागरी पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिली. या पावसाळ्यात आलेल्या पुराने राजापुरात पहिला बळी घेतला आहे.