रत्नागिरी : रायपाटण रूग्णालय मृत्यूशय्येवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन छेडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 04:24 PM2018-10-09T16:24:28+5:302018-10-09T16:28:28+5:30
पाचल परिसरात आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे कटू सत्य अधोरेखित झाले आहे. रायपाटण येथील ग्रामीण रूग्णालय विविध समस्यांमुळे मृत्यू शय्येवर पडले असून याठिकाणी गेली दोन वर्षे एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे.
पाचल : पाचल परिसरात आरोग्य सेवेचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे कटू सत्य अधोरेखित झाले आहे. रायपाटण येथील ग्रामीण रूग्णालय विविध समस्यांमुळे मृत्यू शय्येवर पडले असून याठिकाणी गेली दोन वर्षे एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे.
येथील अनेक असुविधांमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडून पडल्याने स्थानिक गोरगरीब रूग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. याकडे प्रशासन व या भागातील लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष द्यावे अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी दिला आहे.
रायपाटण ग्रामीण रुग्णालयाच्या कार्यक्षेत्रात पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत ३० ते ४० गावांचा समावेश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र्राशिवाय येथे अन्य कोणतीही सुविधा नसल्याने रुग्ण मेटाकूटीस येत आहेत. हा संपूर्ण भाग अत्यंत दुर्गम आहे. त्यामुळे या भागातील रुग्णांना केवळ रायपाटण ग्रामीण रुग्णालयाचाच मोठा आधार आहे.
येथील अपुऱ्या असुविधांमुळे वैद्यकीय सेवेचा लाभ रुग्णांना मिळत नाही. या रुग्णालयात चार वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर असून सध्या या ठिकाणी एकच वैद्यकीय अधिकारी आहेत. मात्र रुग्णसेवेचा संपूर्ण भार एकट्यावरच पडत आहे. त्यामुळे रुग्णालयाला किमान तीन वैद्यकीय अधिकारी तातडीने देण्याची गरज आहे.
या रुग्णालयाच्या दोन्ही इमारती जीर्ण झाल्या असून धोकादायक बनल्या आहेत. या सर्व गैरसोयींकडे आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे बिलकूल लक्ष नाही. त्यामुळे परिसरातून कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. या असुविधांकडे प्रशासन व या भागातील लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष न दिल्यास याविरोधात प्रचंड जनआंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश सौंदळकर यांनी दिला आहे.
पदे रिक्तच रिक्त
एकूण सातपैकी सध्या केवळ तीन नर्स कार्यरत आहेत. तीन लिपिकाची पदे रिक्तच आहेत. क्ष किरण तज्ज्ञांचे पद गेली पाच वर्षे रिक्त आहे. तसेच समुपदेशक व लॅब तंत्रज्ञ ही दोन्ही पदेही रिक्त आहेत. औषध निर्माता व दंततज्ज्ञ ही पदे आजपर्यंत कधीही भरलेली नाहीत.
सडकी यंत्रणा
तंत्रज्ञ नसल्याने सोनोग्राफी मशीन चार वर्षे सडत आहे. त्यामुळे त्यांचा रुग्णांना लाभ मिळत नाही. परिणामी रुग्णांना खाजगी सेवेचा आधार घ्यावा लागत आहे.