राज ठाकरेंचा चिपळूण दौरा रद्द, मुंबईतील मेळाव्यात भूमिका मांडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 11:49 AM2023-07-07T11:49:42+5:302023-07-07T11:50:16+5:30
गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राची राजकीय स्थिती चिखलमय
रत्नागिरी : बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ८ जुलैचा चिपळूण दाैरा पुढे ढकलला आहे. मुंबईतील मेळाव्यात ते आपली भूमिका मांडतील. त्यानंतर ते राज्याचा दाैरा करतील. त्याचवेळी ते जिल्हा दाैऱ्यावर येतील, अशी माहिती मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी बाेलताना दिली.
मनसेच्या रत्नागिरीतील पदाधिकाऱ्यांची गुरुवारी (६ जुलै) रत्नागिरीत बैठक आयाेजित केली हाेती. या बैठकीनंतर वैभव खेडेकर पत्रकारांशी बाेलत हाेते. यावेळी त्यांनी तर्क- वितर्क, राज्याच्या बैठकीत मांडलेली मत याचा खुलासा करण्यासाठी राज ठाकरे मुंबईत मेळावा घेणार आहेत. या सगळ्याला उत्तर या मेळाव्यात देतील, असे स्पष्ट केले.
महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. आजवर अनेक क्रांती झाल्या त्याचे नेतृत्व महाराष्ट्राने केले. मात्र, गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राची राजकीय स्थिती चिखलमय करून टाकलेली आहे. महाराष्ट्रातील जनतेला हे आता नकाेसे झाले आहे. त्यामुळे एक संधी राज ठाकरे यांना द्यावी, अशी भूमिका जनतेने घेतली आहे, असे खेडेकर म्हणाले.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येण्याबाबत त्यांना विचारले असता वैभव खेडेकर म्हणाले की, युती किंवा आघाडी करण्याचा निर्णय राज ठाकरेच घेऊ शकतात. याबाबत राज ठाकरे मुंबईतील मेळाव्यात बाेलतील. तिथून ही काेंडी फुटेल असे वाटते. ज्यापद्धतीने राष्ट्रवादी आणि शिवसेना या दाेन भिन्न विचारांचे सरकार बनू शकते किंवा भाजप आणि राष्ट्रवादीचे सरकार बनू शकते, तसेच या दाेन भावांनी एकत्र येण्याबाबतचा सूर उमटत आहे. राजकारणात काेणत्याही शक्यता नाकारता येत नाही, असेही खेडेकर म्हणाले.
वेगळा पायंडा राज्यात पाहायला मिळतोय. पक्षाचे नेतृत्व, निष्ठा आणि चळवळ हे सगळे लयास जातील. राज्यात एक वेगळा पायंडा पडेल. या घडामाेडींवरून उच्च न्यायालय पक्षांतर्गत कायदा अधिक कडक करण्याबाबत विचार करेल, असेही खेडेकर म्हणाले.