राज ठाकरे करणार कातळशिल्पांची पाहणी, अश्मयुगीन शिल्पे वाचवण्याची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 03:17 PM2020-12-01T15:17:59+5:302020-12-01T15:21:48+5:30
Raj Thackeray, ratnagirinews कोकणातील कातळशिल्पाबाबत वाचून होतो, सोशल मीडियाव्दारे फोटोही पाहिले आहेत. मात्र, प्रत्यक्ष भेट देऊन त्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रकट केली आहे.
रत्नागिरी : कोकणातील कातळशिल्पाबाबत वाचून होतो, सोशल मीडियाव्दारे फोटोही पाहिले आहेत. मात्र, प्रत्यक्ष भेट देऊन त्याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रकट केली आहे.
कोकणातील अष्मयुगीन कातळशिल्प अनेकांसाठी आकर्षणाचा विषय बनला आहे. खोदचित्रांचे शोधकर्ते सुधीर रिसबुड, धनंजय मराठे आणि डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई या अमूल्य सांस्कृतिक ठेव्याचे संवर्धन व्हावे म्हणून धडपडत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना याबाबत माहिती मिळाल्याने त्यांनी या कार्यकर्त्यांना भेटीचे निमंत्रण दिले. शिवाय कातळशिल्पाबाबत माहिती जाणून घेतली. त्यांच्यासमवेत झालेल्या बैठकीमध्ये शोधकर्ते सुधीर रिसबुड, धनंजय मराठे यांनी कोकणातील कातळ खोद चित्र रचनेबाबत सविस्तर माहिती विषद केली.
कातळशिल्प संरक्षण संवर्धन याबाबत शासन प्रशासन पातळीवर चाललेल्या कामाची माहिती दिली तसेच व्यक्तिगत पातळीवर आणि निसर्गयात्री संस्था, रत्नागिरीच्या माध्यमातून ऐतिहासिक, प्रागैतिहासिक तसेच जैवविविधतेचे संरक्षण संवर्धन करुन त्याला पर्यटन क्षेत्राची जोड देत पर्यटन विकास आणि स्थानिक रोजगार निर्मितीसाठी हाती घेतलेल्या कार्याची माहिती दिली. पर्यटनवाढीला या शिल्पांचा मोठा आधार होणार आहे, हे सांगतानाच कोकणातील एकंदर पर्यटन विकासाबाबतही यावेळी चर्चा झाली.
काही मौलिक बाबी राज ठाकरे यांनी मांडल्या. तसेच कातळशिल्पाबाबतच्या कामाचे कौतुक केले. लवकरच या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी इन्फिगो आय केअर सेंटरचे संचालक डॉ. श्रीधर ठाकुरदेसाई, धनंजय पराडकर, उद्योजक सुहास ठाकुरदेसाई, कौस्तुभ सावंत, वास्तूविशारद मकरंद केसरकर उपस्थित होते.