रिफायनरीबाबत राजन साळवी यांची भूमिका दुटप्पी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:21 AM2021-06-24T04:21:49+5:302021-06-24T04:21:49+5:30

राजापूर : रिफायनरी प्रकल्पाबाबत प्रारंभीपासूनच आपली भूमिका ही समर्थनाची आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार सोडून ज्या ...

Rajan Salvi's role regarding refinery is twofold | रिफायनरीबाबत राजन साळवी यांची भूमिका दुटप्पी

रिफायनरीबाबत राजन साळवी यांची भूमिका दुटप्पी

googlenewsNext

राजापूर : रिफायनरी प्रकल्पाबाबत प्रारंभीपासूनच आपली भूमिका ही समर्थनाची आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाणार सोडून ज्या ठिकाणी प्रकल्पाची मागणी होईल, त्या ठिकाणी हा प्रकल्प राबविला जाईल, अशी भूमिका मांडली आहे. त्यामुळे काही ग्रामपंचायतींनी प्रकल्प समर्थनार्थ ठराव करून प्रकल्प राबविण्याची मागणी केली आहे. त्यामुळे आपणही नगरपरिषदेच्या स्थानिकांना विश्वासात घेऊन मागणी असेल तेथे प्रकल्प व्हावा या भूमिकेचे समर्थन करत ठरावाला समर्थन दिलेले आहे आणि ते योग्यच आहे. मात्र, या प्रकल्पाबाबत कायमच दुटप्पी भूमिका घेणाऱ्या आमदार राजन साळवी यांनी केवळ स्टंटबाजी न करता आपली स्पष्ट भूमिका जाहीर करावी, असे थेट आव्हानच शिवसेनेच्या नगरसेविका प्रतीक्षा खडपे यांनी दिले आहे.

पक्षात आपले स्पष्ट मत मांडणे हा गुन्हा आहे काय, असा स्पष्ट प्रश्न करून तसे असेल तर ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नक्कीच नाही, असा घणाघातही खडपे यांनी केला आहे.

राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनार्थन ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने शिवसेना नगरसेविका प्रतीक्षा खडपे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा आमदार राजन साळवी यांनी केली आहे. यावर खडपे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हकालपट्टीबाबत आपल्याकडे कोणतेच अधिकृतपणे पत्र आलेले नाही. आपणही सोशल मीडिया व वर्तमानपत्रात वाचले आहे. मात्र, अशा प्रकारे पक्षात आपले स्पष्ट मत मांडणे गुन्हा आहे काय, असा सवाल खडपे यांनी उपस्थित केला आहे.

रिफायनरी प्रकल्पाबाबत प्रारंभीपासूनच आपली भूमिका समर्थनाची आहे. नगरपरिषदेत या विषयावर होणाऱ्या चर्चेच्या अनुषंगाने आपण गटनेते विनय गुरव यांच्याशी चर्चा करून आपली भूमिका त्यांना सांगितली होती. यावर आपण आपले वैयक्तिक मत मांडू शकता, असेही गुरव यांनी सांगितले. त्यामुळे मग आयत्या वेळच्या विषयात झालेल्या चर्चा व ठरावावर बोलताना आपण आपली स्पष्ट भूमिका मांडली. नाणारचा विषय आपल्यासाठी संपलेला असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितेलेले आहे. मात्र ज्या ठिकाणी जनतेची या प्रकल्पाची मागणी असेल त्या ठिकाणी तो राबविण्याबबात विचार केला जाईल, असेही जाहीर केले आहे. त्यामुळे तालुक्यात नाटे व अन्य ग्रामपंचायतींनी हा प्रकल्प राबवावा, असे ठराव केले आहेत. मग आपणही ठराव का करू नये, असा आपला प्रश्न आहे, असे त्या म्हणाल्या.

स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन त्यांना जिथे प्रकल्प हवा असेल तेथे व त्यांच्या शंकांचे निरसन करून हा प्रकल्प व्हावा असा ठराव मांडण्यात आला. त्याला आपण समर्थन दिले आणि ते योग्यच आहे, स्पष्ट मत खडपे यांनी मांडले आहे. तालुक्यात शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे या प्रकल्पाला समर्थन आहे. मात्र शिवसेनेतील या अशा दबावामुळे आणि हकालपट्टीच्या भीतीमुळे कोण बोलत नाही, असेही खडपे यांनी सांगितले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनीच आम्हा महिलांना कायम आपली भूमिका आणि मते स्पष्ट मांडा, असे शिकवले आहे. त्यामुळे अशा प्रकारे आपले स्पष्ट मत मांडणे हा जर का गुन्हा असेल तर ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाही, असा टोलाही खडपे यांनी लगावला आहे.

आमदार राजन साळवी यांची या प्रकल्पाबाबतची भूमिका कायमच दुटप्पी राहिली आहे. त्यांनी वेगवेगळ्या पध्दतीने भूमिका मांडण्यापेक्षा आपली स्पष्ट भूमिका जाहीर करावी, असे आव्हान खडपे यांनी दिले आहे. जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून तालुक्याच्या विकासाबाबत काहीतरी ठोस भूमिका घेणे अपेक्षित असते ती अगोदर घ्या, त्यासाठी राजापूरकरांनी तुम्हाला निवडून दिलेले आहे. हिंमत असेल तर विकासासाठी या प्रकल्पाचे जाहीर समर्थन करा आणि समर्थनाच्या लढ्यात उतरा, अनेक शिवसैनिक आणि तालुकावासीय तुमचे स्वागत करतील. हकालपट्टी आणि कारवायांच्या धमक्या आम्हाला देऊ नका. आम्ही कायमच विकासासाठी त्याला तयार आहोत, असेही खडपे यांनी यावेळी ठणकावून सांगितले.

Web Title: Rajan Salvi's role regarding refinery is twofold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.