राजापुरात २१ शाळांच्या तब्बल ५५ वर्गखोल्या नादुरुस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:30 AM2021-04-13T04:30:01+5:302021-04-13T04:30:01+5:30
राजापूर : राजापुरातील जवळपास २१ शाळांच्या ५५ वर्गखोल्या नादुरुस्त झाल्या असून, पावसाळ्यापूर्वी या शाळांची दुरुस्ती न झाल्यास या शाळांमध्ये ...
राजापूर : राजापुरातील जवळपास २१ शाळांच्या ५५ वर्गखोल्या नादुरुस्त झाल्या असून, पावसाळ्यापूर्वी या शाळांची दुरुस्ती न झाल्यास या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसविणे धोक्याचे ठरणार आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून अशा धोकादायक शाळांची यादी वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आली असून, आता या शाळांच्या दुरुस्तीला निधी मिळण्याची प्रतीक्षा आहे.
शैक्षणिक सोयी-सुविधांसाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधीचा निधी खर्च करण्यात येतो. मात्र, आजही काही शाळा सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. प्राथमिक शाळांच्या अनेक इमारतींची गेल्या काही वर्षात दुरुस्ती न झाल्याने अशा इमारतीतील वर्गखोल्या मोडकळीला आल्या आहेत. त्यामुळे पावसाळ्यात अशा वर्गखोल्यांमध्ये शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर पावसाचे पाणी पडणार आहे. अनेक प्राथमिक शाळांच्या स्लॅब षटकोनी इमारतींना तर मोठ्या प्रमाणात गळती लागलेली आहे. त्यामुळे पावसाळ्यात अशा वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बसवणे मुश्किल बनले आहे.
गतवर्षी कोरोनामुळे शाळा बंद होत्या. कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्यानंतर पुन्हा शाळा गजबजणार आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर अशा नादुरुस्त शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसविणे धोक्याचे ठरणार आहे. त्यामुळे तालुक्यातील नादुरुस्त शाळांची यादी शिक्षण विभागाने तयार करावी, अशी मागणी पंचायत समितीचे सदस्य अभिजीत तेली यांनी बैठकीमध्ये केली होती. तसेच ज्या शाळा अत्यंत धोकादायक आहेत, त्यांचा प्राधान्याने या यादीत समावेश करावा, अशीही मागणी त्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने तालुक्यातील २१ धोकादायक शाळांची यादी तयार केली आहे. या शाळांमध्ये सुमारे ५५ वर्गखोल्या नादुरुस्त असून, त्यांची पावसाळ्यापूर्वी डागडुजी होणे आवश्यक आहे. अन्यथा पावसाळ्यात या वर्गखोल्यांमध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांना अन्यत्र आसरा घ्यावा लागणार आहे.
चाैकट
नादुरुस्त शाळा
पेंडखळे नं.१, उन्हाळे गंगातूर्थ नं.१, हातिवले नं.१, जुवाठी, कारवली नं.१, ओशीवळे नं.१, धोपेश्वर नं.१, तुळसुंदे, पांगरे बु.नं.१, गोठणे-दोनिवडे नं. २, पन्हळे तर्फे राजापूर, वाडीखुर्द, तुळसवडे नं.१, अणसुरे आडाभराडे, सौंदळ नं.१, वाडापेठ, वाडाभराडे, चौके, वाटूळ नं.४, रायपाटण नं. ३, मंदरूळ नं. १ या शाळांचा समावेश आहे.