महामार्गावरील नवीन पुलामुळे राजापूर-चिखलगाव मार्ग धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:32 AM2021-07-27T04:32:40+5:302021-07-27T04:32:40+5:30
राजापूर : अर्जुना नदीला आलेल्या पुरामुळे गेले सात ते आठ दिवस बंद असलेला राजापूर-चिखलगाव मार्ग वाहतुकीस खुला झाला आहे. ...
राजापूर : अर्जुना नदीला आलेल्या पुरामुळे गेले सात ते आठ दिवस बंद असलेला राजापूर-चिखलगाव मार्ग वाहतुकीस खुला झाला आहे. मात्र, गेले आठ दिवस सततच्या पुराच्या पाण्यामुळे नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या पुलाच्या ठिकाणी या मार्गाची मोठ्या प्रमाणावर धूप झाली आहे, तर रस्त्यालगत दरडीची माेठ्या प्रमाणात धूप झाल्याने हा भाग धोकादायक बनला आहे. या ठिकाणाहून एका बाजूने वाहणारी वेगाने वाहणारी नदी तर दुसऱ्या बाजूला दरड कोसळण्याचा दुहेरी धोका निर्माण झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर अर्जुना नदीवर शीळ-कोंढेतड यादरम्यान महामार्गावरील हा सर्वाधिक उंचीचा पूल उभारला जात आहे. गेले दोन वर्षांपासून या पुलाच्या निर्मितीसाठी नदीपात्रात पिलर उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. मेअखेरीस या पुलाचे नदीपात्रातील पिलर उभे करून करण्यात आले, तर या पुलाला जोडण्यासाठी राजापूर-चिखलगाव मार्गावर शीळ हद्दीवर उंच डोंगरावर पिलर उभारण्यात आला आहे. मात्र, या पुलासाठी उंच डोंगरावर आणि नदीपात्रात या मार्गाच्या लगत उभारण्यात आलेल्या दोन्ही पिलरमुळे या मार्गाला मोठा धोका निर्माण झाला आहे.
नव्याने उभारण्यात येत असलेल्या या पुलासाठी अर्जुना नदीपात्रात तीन पिलर उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये शीळ-चिखलगावर मार्गाकडील पिलर हा अवघ्या दहा ते पंधरा फुट अंतरावर घालण्यात आला आहे. या पिलरच्या रस्त्याकडील बाजूने नदीचा प्रवाह वेगात येत असल्याने मुळातच अरुंद असलेल्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. या ठिकाणी संरक्षक रेलिंग उभारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. भविष्यात हा रस्त्याला संरक्षण भिंत बांधणे अत्यावश्यक आहे. मात्र सद्य:स्थितीत मोठ्या प्रमाणात रस्त्याची धूप झाल्याने हा रस्ताच वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर दुसऱ्या बाजूने रस्त्यालगतची दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
----------------------------------
मूळ समस्येवर नव्याने भर
राजापूर शीळमार्गे चिखलगाव हा कोल्हापूरकडे जाणारा जवळचा मार्ग आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षांत या रस्त्याचे रुंदीकरण व उंचीकरण न केल्याने दरवर्षी पावसाळ्यात हा रस्ता पुराच्या पाण्याखाली जातो. त्यामुळे या भागातील जनतेला दहा ते बारा किलोमीटरचा वळसा घालून घर गाठावे लागते. या रस्त्याचे उंचीकरण करावे, अशी या भागातील जनतेची अनेक वर्षांची मागणी आहे. मात्र, त्याकडे शासन प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. असे असतानाच महामार्गाचे चौपदरीकणात या ठिकाणी महामार्गावरील सर्वाधिक पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गाच्या मूळ समस्येत नव्याने भर पडली आहे.