पावसामुळे राजापूर शहराची पाणीटंचाई दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:32 AM2021-05-18T04:32:50+5:302021-05-18T04:32:50+5:30
राजापूर : ताेक्ते वादळामुळे रविवारी दिवसभर पावसाने थैमान घातल्याने राजापूर शहराला भेडसावणारी पाणीटंचाई दूर होणार आहे. राजापूर शहराला पाणीपुरवठा ...
राजापूर : ताेक्ते वादळामुळे रविवारी दिवसभर पावसाने थैमान घातल्याने राजापूर शहराला भेडसावणारी पाणीटंचाई दूर होणार आहे. राजापूर शहराला पाणीपुरवठा करणारे सायबाचे धरण कालच्या पावसामुळे तुडुंब भरले असून, तालुक्यातील अन्य ठिकाणचे पाण्याचे स्रोतही पुनर्जीवित झाले आहेत. त्यामुळे पुढील टंचाईच्या काळातील पाणीटंचाई जवळजवळ संपुष्टात आली आहे.
कडक उन्हाळ्यामुळे राजापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईचे संकट जाणवत होते. राजापूर नगर परिषदेने राजापूर शहरात गेल्या महिन्याभरापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. नुकताच दोन दिवसाआडही करण्यात आला होता. मात्र रविवारी ताेक्ते वादळ तालुक्यात धडकल्यानंतर सर्वत्र पावसाने मुसळधारपणे बरसायला सुरुवात केली होती. सुमारे २४ तासांहून अधिक काळ बरसणाऱ्या पावसामुळे राजापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कोदवली येथील सायबाच्या धरणात पाणीसाठा वाढला आहे. धरण तुडुंब भरून वाहू लागले आहे. त्यामुळे पुढील दिवसांत पाणीटंचाईवर मात करता येईल. पावसामुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करता येईल, असे नगराध्यक्ष जमीर खलिफे यांनी स्पष्ट केले, तर तालुक्याच्या टंचाईग्रस्त भागातील पाण्याचे दुर्भिक्षही संपुष्टात येणार आहे.