राजापूर उपसभापती निवडणूक ३१ ऑगस्टला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:33 AM2021-08-26T04:33:23+5:302021-08-26T04:33:23+5:30
राजापूर : राजापूर पंचायत समितीच्या उपसभापतिपदाची निवडणूक दिनांक ३१ ऑगस्टला होणार असून, सत्ताधारी शिवसेनेकडून पाचलच्या सदस्य अमिता सुतार यांना ...
राजापूर : राजापूर पंचायत समितीच्या उपसभापतिपदाची निवडणूक दिनांक ३१ ऑगस्टला होणार असून, सत्ताधारी शिवसेनेकडून पाचलच्या सदस्य अमिता सुतार यांना संधी दिली जाणार आहे.
राजापूर पंचायत समितीमधील सत्ताधारी शिवसेनेच्या सूत्रानुसार सर्व सदस्यांना सभापती व उपसभापतिपद देण्याचे धोरण आहे. त्यानुसार शिवसेनेच्या दहापैकी नऊ सदस्यांना गेल्या साडेचार वर्षांत ही दोन्ही पदे भूषविता आली आहेत तर राहिलेल्या एका सदस्याला यावेळी उपसभापतिपदाची संधी मिळणार आहे. विद्यमान उपसभापती उन्नती वाघरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त असलेल्या उपसभापतिपदासाठी मंगळवारी (दि. ३१) ऑगस्टला निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी राजापूरच्या उपविभागीय अधिकारी वैशाली माने या पीठासन अधिकारी असतील.
राजापूर पंचायत समितीमध्ये एकूण बारा सदस्यांपैकी दहा शिवसेनेचे असून काँग्रेस व राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक सदस्य आहे. शिवसेनेकडून यावेळी पाचल पंचायत समिती गणाच्या सदस्य अमिता आत्माराम सुतार यांना संधी मिळेल, असे निश्चित मानले जात आहे. आतापर्यंत पद न मिळालेल्या त्याच एकमेव सदस्या आहेत. त्यांना संधी मिळाल्यास अनेक वर्षांनंतर पाचलला पंचायत समितीमधील उपसभापति पद भूषविण्याची संधी मिळणार आहे. यापूर्वी पाचलचे सदस्य दत्ताराम गोरुले हे सभापती झाले होते. त्यांच्यानंतर अमिता सुतार यांची उपसभापतिपदी निवड होत असल्याने पाचलला सलग तीन टर्मनंतर पुन्हा संधी मिळत आहे.