लसीकरणाचा गाेंधळ टाळण्यासाठी राजापूर नगर परिषद करणार नियाेजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:31 AM2021-05-14T04:31:02+5:302021-05-14T04:31:02+5:30
राजापूर : शहरात दुसऱ्या डोसच्या लसीकरणासाठी होणारी गर्दी विचारात घेता शहरातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत नगर परिषदेकडून नियोजन करण्याबाबत तहसीलदार प्रतिभा ...
राजापूर
:
शहरात दुसऱ्या डोसच्या लसीकरणासाठी होणारी गर्दी विचारात घेता शहरातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत नगर परिषदेकडून नियोजन करण्याबाबत तहसीलदार प्रतिभा वराळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निखिल परांजपे यांच्याशी चर्चा करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांनी दिली आहे.
राजापूर शहरातील ग्रामीण रुग्णालय व राजापूर हायस्कूल या दोन लसीकरण केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. यामध्ये १८ ते ४४ वयोगटासह ४५ वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाचे शेड्युल केले जात आहे. मात्र, लसीकरण करताना सध्या मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यातच ज्यांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे़ त्यांना दुसऱ्या डोससाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. तर ज्या दिवशी लसीकरणाचे शेड्युल येते त्या दिवशी या लसीकरण केंद्रांवर गर्दी होत आहे.
याबाबत मंगळवारी नगराध्यक्ष ॲड. खलिफे यांनी राजापूर तहसीलदार प्रतिभा वराळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निखिल परांजपे, गटविकास अधिकारी सागर पाटील यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. यावेळी राजापूर नगर परिषद हद्दीतील नागरिकांच्या लसीकरणाच्या नियोजनाची जबादारी नगर परिषदेकडे द्यावी, अशी मागणी केल्याचे ॲड. खलिफे यांनी सांगितले. याबाबत निश्चितच निर्णय घेतला जाईल, असेही तहसीलदार वराळे यांनी सांगितले.
राजापूर शहरात लसीकरणाबाबत नियोजन करताना प्रभागनिहाय करून ज्यांनी पहिला डोस घेतला आहे, त्यांची मुदत संपत आहे, त्यांना प्राधान्याने लस देण्याबाबत नियोजन केले जाणार आहे. तर शहरातील सर्व प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांची यादी तयार करून त्याप्रमाणे नोंदणी करून त्यांना संपर्क साधून लसीकरण केंद्रावर बोलावून लस देण्याबाबत नियोजन करण्याचा मानस असल्याचे ॲड. खलिफे यांनी सांगितले. यासाठी आरोग्य विभागानेही सहकार्य करण्याची तयारी दर्शविल्याचे ॲड. खलिफे यांनी सांगितले.