राजापूर पोलिसांनी मागितली माफी

By admin | Published: March 2, 2015 11:03 PM2015-03-02T23:03:40+5:302015-03-03T00:32:54+5:30

बोगस दाखले प्रकरण : तहसीलदारांना दिले पत्र, ताब्यात घेतलेला दस्तऐवज परत

Rajapur police apologize for asking | राजापूर पोलिसांनी मागितली माफी

राजापूर पोलिसांनी मागितली माफी

Next

राजापूर : बोगस दाखले प्रकरणाचा तपास करताना सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत तहसीलदारांची कोणतीही परवानगी न घेता राजापूर पोलिसांनी नेलेला दस्तऐवज अखेर तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करताच रितसर पत्रान्वये पुन्हा राजापूर तहसीलदारांकडे जमा केला आहे. मात्र, या दस्तऐवजात काही बदल झाला असल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी राजापूर पोलिसांचीच राहील, असे तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे यांनी स्पष्ट केले आहे.
प्रांतांचे सील वापरुन खोट्या सह्या करून बोगस दाखले दिल्याचे प्रकरण गेले तीन आठवडे राजापुरात चांगलेच गाजत आहे. मात्र, पोलिसांच्या तपासावर सर्वसामान्यांमधून शंका व्यक्त करण्यात येत होती. या प्रकरणाचा तपास सुरु असताना तालुक्यातील सर्व वृत्तपत्रांच्या कार्यालयात पोस्टाव्दारे अज्ञाताने दोन बोगस दाखले पाठवले होते.
या दाखल्यांवर राजापूर सेतू कार्यालयाचा लोगो असल्यामुळे या प्रकरणाचा तपास करताना राजापूर पोलिसांनी आपला मोर्चा सेतू कार्यालयाकडे वळवला होता. अचानकपणे सेतू कार्यालयात तपासासाठी जाताना राजापूर पोलिसांनी याबाबतची कोणतीही कल्पना तहसीलदारांना दिली नव्हती. उलट राजापूर सेतू कार्यालयात विनापरवाना घुसून कर्मचाऱ्यांना दमदाटी करत तेथील काही दस्तऐवज हस्तगत केला गेला होता.
या सर्व प्रकारामुळे राजापूरचे तहसीलदार गुरुनाथ हुन्नरे यांनी पोलिसांच्या या कृतीवर नाराजी व्यक्त करत याबाबतची लेखी तक्रार जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली होती. त्यानंतर वरिष्ठ कार्यालयाकडून समज येताच पोलिसांनी नरमाईची भूमिका घेत तहसीलदारांच्या अपरोक्ष गेलेला सेतू कार्यालयातील दस्तऐवज पुन्हा आणून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणत्याही प्रकारे लेखी न देता तसे दस्तऐवज स्विकारण्यास राजापूर तहसीलदारानी स्पष्ट नकार दिला व अगोदर विनापरवाना गेलेला दस्तऐवज जबाबदार अधिकाऱ्यांच्या लेखी पत्रानिशी सादर करावा, असे फर्मावले. त्यामुळे हतबल झालेल्या राजापूर पोलिसांनी संबंधित दस्तऐवज अखेर लेखी पत्रानिशी राजापूर तहसीलदारांच्या ताब्यात देऊन आपली सुटका करून घेतली.
दरम्यान, याप्रकरणी राजापूर पोलिसांना अन्य कोणत्याही प्रकारचे दस्तऐवज हवे असल्यास त्यांना लेखी पत्रानंतर देण्यात येतील, तसेच याप्रकरणी सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे जबाब राजापूर पोलिसांनी आपल्यासमोर घेण्यात यावेत, असे आदेश देण्यात आल्याची माहिती तहसीलदारांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rajapur police apologize for asking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.