Ratnagiri: राजापूरचे रेल्वे स्थानक चकाचक, प्रवासी मात्र वाऱ्यावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 18:13 IST2024-12-30T18:12:30+5:302024-12-30T18:13:19+5:30
डिजिटल एलईडी लाईटचे बोर्ड बसवले. मात्र, या बोर्डमधील वीज बंद

Ratnagiri: राजापूरचे रेल्वे स्थानक चकाचक, प्रवासी मात्र वाऱ्यावर
राजापूर : कोकण रेल्वे मार्गावरील काही स्थानकांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये राजापूर स्थानकाचाही समावेश आहे. सुमारे ४ कोटी खर्च करून रेल्वे स्थानकाचे सुशाेभीकरण केले आहे. मात्र, दोन महिन्यांतच या स्थानकाच्या नावाचे बोर्ड खराब झाले आहेत. तसेच, चेहरा मोहरा बदललेल्या स्थानकात अनेक गाड्यांना थांबाच नसल्याने येथील प्रवासी अजूनही वाऱ्यावरच आहेत. ‘स्थानक सुधारले, पण प्रवासी वाऱ्यावर’ अशी अवस्था सध्या झाली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण आणि खेड नंतर महत्त्वाचे स्थानक म्हणजे राजापूर रोड स्थानक आहे. त्याव्यतिरिक्त सौंदळ येथे हॉल्ट स्थानक असून, तेथे केवळ दिवा - सावंतवाडी ही एकमेव पॅसेंजर एक ते दोन मिनिटे थांबते. कोराेनाआधी रत्नागिरी-दादर ही पॅसेंजर सुरु होती. या गाडीला साैंदळ थांबा होता. मात्र, काेराेना काळात ही गाडी बंद झाली. ती काही पुन्हा सुरू झालेली नाही.
राजापूर शहरापासून सुमारे पंधरा ते वीस किलाेमीटर अंतरावर राजापूर रोड रेल्वेस्थानक आहे. या स्थानकात मांडवी, कोकणकन्या आणि तुतारी या नियमित एक्स्प्रेससह उधना, नागपूर आणि अलीकडे सुरू झालेली थिविम, अहमदाबाद या गाड्यांसह दिवा - सावंतवाडी ही पॅसेंजर याठिकाणी थांबते. उर्वरित गाड्यांना थांबे नाहीत. त्यामुळे या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसाेय हाेत आहे. वारंवार मागणी करुनही अन्य गाड्यांना थांबा दिला जात नसल्याने स्थानक चकाचक पण प्रवासी वाऱ्यावर अशीच स्थिती निर्माण झाली आहे.
या रेल्वेस्थानकाचे सुशाेभीकरण करण्यात आले आहे. सुशोभीकरणात स्थानकाच्या दर्शनी गेटवर डिजिटल एलईडी लाईटचे बोर्ड बसवले आहेत. मात्र, या बोर्डमधील वीज बंद पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राजापूर या अक्षरातीलच वीज खराब झाल्याने या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.