राजापुरात संततधार, पूरस्थिती कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:22 AM2021-07-16T04:22:46+5:302021-07-16T04:22:46+5:30
हातिवलेत रस्ता खचला राजापुरात संततधार, चौथ्या दिवशीही पूरस्थिती कायम हातिवलेत रस्ता खचला - हातिवलेत रस्ता खचला - शीळ-सौंदळ मार्ग ...
हातिवलेत रस्ता खचला
राजापुरात संततधार, चौथ्या दिवशीही पूरस्थिती कायम
हातिवलेत रस्ता खचला
- हातिवलेत रस्ता खचला
- शीळ-सौंदळ मार्ग पाच दिवस बंद
- ग्रामीण भागातील एसटी सेवा ठप्प
लाेकमत न्यूज नेटवर्क
राजापूर : गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात संततधार सुरूच असून, गुरुवारी चौथ्या दिवशीही अर्जुना आणि कोदवली नदी दुथडी भरून वाहत आहेत. पुराच्या शक्यतेने शहर बाजारपेठेतील व्यापारी आणि नागरिक सतर्क झाले आहेत. तर अर्जुना नदीला आलेल्या पुरामुळे सलग चौथ्या दिवशी शीळ-चिखलगाव मार्ग पाण्याखाली असून, शहरातील चिंचबांध रस्ताही पाण्याखाली राहिला आहे. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील सर्व एस. टी. फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. तर तालुक्यात किरकोळ पडझडीच्या घटना वगळता मोठे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. तालुक्यात बुधवारी १०७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर तालुक्यात २२७१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. रविवारी सायंकाळपासून तालुक्यात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला आहे. बुधवारी हातिवले - शिंदेवाडी येथे गावात जाणाऱ्या रस्त्यालगतची जमीन खचली आहे. गोठणे दोनिवडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मागील संरक्षण भिंत कोसळली आहे. या किरकोळ पडझडीच्या घटना वगळता तालुक्यात मोठी हानी झालेली नसल्याची माहिती तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिली आहे.
----------------------
शीळ-चिखलगाव मार्ग पाण्याखाली
सातत्याने मागणी करूनही शीळ-चिखलगाव रस्त्याची उंची वाढविणे आणि नव्या पुलाखालील नदीपात्रातील मातीचा भराव आणि गाळ न काढल्याने गेले चार दिवस शीळ-चिखलगाव रस्त्यावर पुराचे पाणी येऊन हा मार्ग पाण्याखाली राहिला आहे. त्यामुळे या भागातील शीळ, चिखलगाव, गोठणे, दोनिवडे, आंगले, फुफेरे या भागातील नागरिकांना ओणी सोैंदळ मार्गे फेरा घालत घर गाठावे लागत आहे.
--------------------------
ग्रामीण भागातील एस. टी. सेवा बंद
अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील एस. टी. फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. केवळ राजापूर-येरडव आणि राजापूर-रत्नागिरी या मार्गावर एस. टी. वाहतूक सुरू ठेवण्यात आल्याची माहिती आगारप्रमुख राजेश पाथरे यांनी दिली आहे.
------------------------------
टपरी व्यावसायिकांना फटका
गेल्या चार दिवसांपासून शहर बाजारपेठेत पूरसदृश स्थिती निर्माण झाल्याने व पुराचे पाणी शहरातील जवाहरचौक व शिवाजी पथ भागात येण्याच्या शक्यतेने या भागातील छोटे व्यावसायिक, पान टपरी व्यावसायिक यांना फटका बसला आहे. गेल्या चार दिवसांपासून ही दुकाने बंद असल्याने त्याचा फटका व्यावसायिकांना बसला आहे.
------------------------
भातपीकाला फटका
पावसामुळे शीळ, गोठणे दोनिवडे, चिखलगाव, आंगले, दोनिवडे, उन्हाळे, कोदवली, खरवते, ओणी, सौंदळ, पाचल, रायपाटण, येळवण, तळवडे व पूर्वभागात अनेक गावांतील तसेच गोवळ, शिवणे, तारळ, उपळे, प्रिंंदावण या परिसरात माेठ्या प्रमाणावर भातशेती पाण्याखाली गेली आहे.