राजापूर तालुक्यात ७ शाळा शून्य शिक्षकी, शिक्षण विभाग तोंडघशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:50 PM2019-06-22T12:50:49+5:302019-06-22T12:53:45+5:30
शिक्षकांच्या बदल्यानंतर राजापूर तालुक्यातील ७ शाळा शून्य शिक्षकी झाल्याचे आजच्या जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत पदाधिकाऱ्यांनीच समोर आणल्याने शिक्षण विभाग तोंडघशी पडला. चिपळूणातील प्राथमिक शाळा चिंचनाका या शाळेतून विद्यार्थी अन्य शाळेत हलविण्याचा निर्णय झाल्याने गेल्या ही शाळा वाचविण्याचा चाललेला प्रयत्न अखेर फोल ठरला.
रत्नागिरी : शिक्षकांच्या बदल्यानंतर राजापूर तालुक्यातील ७ शाळा शून्य शिक्षकी झाल्याचे जिल्हा परिषद स्थायी समिती पदाधिकाऱ्यांनीच समोर आणल्याने शिक्षण विभाग तोंडघशी पडला. चिपळूणातील प्राथमिक शाळा चिंचनाका या शाळेतून विद्यार्थी अन्य शाळेत हलविण्याचा निर्णय झाल्याने गेल्या ही शाळा वाचविण्याचा चाललेला प्रयत्न अखेर फोल ठरला.
गेल्या काही महिन्यांपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या शिक्षकांच्या बदल्या गाजत होत्या़ समानीकरणाच्या मुद्यावर या बदल्या करण्यात आल्या होत्या़ मात्र, या बदल्या झाल्यानंतर गोंधळ उडाला होता़ या बदल्या करताना सुगम-दुर्गम शाळांचा मुद्दा सुरुवातीला पुढे आला होता़ तोही शासनाने मान्य न करताच या बदल्या केल्या़ त्यानंतर झालेल्या शिक्षक बदल्यांमध्येही घोळ झाल्याचे उघड झाले़. त्यामुळे शिक्षक संघटना तसेच अनेक शिक्षकांनी त्यावर आक्षेप घेतला होता़.
जिल्हा परिषद प्रशासनानेही या बदल्यानंतर एकही शाळा शून्य शिक्षकी राहणार नाही, असा दावा केला होता़ मात्र, अन्यायग्रस्त शिक्षकांचे समुपदेशन दोनच दिवसांपूर्वी झाले़ त्यानंतर राजापूर तालुक्यातील ७ शाळा शून्य शिक्षकी झाल्याचे समोर आले आहे़. शिक्षण विभागाने शिक्षक बदल्यानंतर शून्य शिक्षकी एकही राहणार नाही, असा केलेला दावाही फोल ठरला आहे़.
चिपळूण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचनाका या शाळेचा विषय गेले अडीच वर्षे स्थायी समितीच्या सभेत गाजत होता़. ही शाळा १०० वर्षापूर्वीची ऐतिहासिक शाळा असल्याने ती सुरुच ठेवावी, अशी मागणी विरोध पक्षनेते विक्रांत जाधव यांनी अनेकदा केली होती़ मात्र, या शाळेच्या आॅडिट अहवालामध्ये ती धोकादायक असून विद्यार्थ्यांच्या जिवितेस धोका असल्याचे म्हटले आहे़, शाळा व्यवस्थापन समितीने ही शाळा धोकादायक नसल्याचा अहवाल दिला आहे़ तरीही मुलांच्या जिवितेस धोका असल्याने या शाळेतील विद्यार्थी अन्य जवळच्या शाळेत हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव आणि नेत्रा ठाकूर यांनी याला विरोध केला़, त्यामुळे ही शाळा आता इतिहास जमा होणार आहे.