विलाेभनीय धबधब्यांचा राजापूर तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2023 12:48 PM2023-07-23T12:48:13+5:302023-07-23T12:51:49+5:30

अखेरच्या आठवड्यात सुरुवात करूनही नंतर त्याने विश्रांती घेतली. मात्र, आता तो मुसळधार कोसळतोय.

Rajapur taluka of magnificent waterfalls | विलाेभनीय धबधब्यांचा राजापूर तालुका

विलाेभनीय धबधब्यांचा राजापूर तालुका

googlenewsNext

- विनोद पवार

पाऊस मुसळधार असला तरी कोकणात फिरायचं तर पावसाळ्यातच. हिरव्यागार कोकणातल्या हिरव्या हिरव्या डोंगरांच्या अंगाखांद्यावर धावणारं फेसाळतं पाणी जागोजागी दिसतं आणि ते पाहणारा त्यात हरवून जातो. यंदा हे सुख मिळणार की नाही, अशी स्थिती जूनमध्ये वाटत होती. खरं तर जून महिन्यातच धबधबे प्रवाहित होतात आणि स्थानिकांसह पर्यटकांची पावलेही धबधब्यांकडे वळतात; पण जवळजवळ सगळाच जून कोरडा गेला. अखेरच्या आठवड्यात सुरुवात करूनही नंतर त्याने विश्रांती घेतली. मात्र, आता तो मुसळधार कोसळतोय. अगदी मुक्तपणे त्यामुळे डोंगर हिरवेगाव झाले आहेत आणि त्यांच्या अंगाखांद्यावर धबधबे धावू लागले आहेत. राजापूर तालुक्यात अनेक ठिकाणी असे धबधबे दिसू लागले आहेत.

धुतपापेश्वर धबधबा

तालुक्यातील शंकराचे जागृत स्थान असलेल्या धुतपापेश्वर मंदिरानजीक वाहणाऱ्या मृडानी नदीचा मोठा प्रवाह खाली नदीपात्रात पडतो. ते दृश्य नयनरम्य असते. परिसरातील शांततेला लयबद्ध आवाजाची साथ देत नदीपात्रात कोसळणारा पाण्याचा प्रवाह मन मोहवून टाकतो. श्रावण महिन्यात दर सोमवारी मंदिरात दर्शनासाठी येणारे बरेच भाविक देवदर्शनानंतर या  धबधब्याचा आनंद घेतात.
ठिकाण : राजापूर शहरापासून केवळ दाेन किलोमीटर
कसे जाल : राजापूर जवाहर चौकातून रिक्षा मिळतात.

हर्डीचा कातळकडा

राजापूर शहरापासून चार किमीवर हर्डी येथील कातळकडा  धबधबाही प्रवाहित झाला आहे. येथे हौशी पर्यटक स्नानासाठी जातात. हा धबधबा अतिशय सुरक्षित असून याठिकाणी जाण्यासाठीही खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. राजापूर धारतळे मार्गावर हर्डी गावापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे. थोडेसे खाली चालत गेले की उंचावरून पडणारा पाण्याचा प्रपात अनुभवता येतो. सुरक्षित असल्यामुळे या धबधब्याखाली मनसोक्त भिजता येते. त्यामुळे येते पर्यटकांची जास्त पसंती असते.  
ठिकाण : राजापूर शहरापासून केवळ चार किलोमीटर
कसे जाल : खासगी वाहन

सौंदळचा ओझरकडा

तालुक्याच्या मध्य- पूर्व परिसरात सौंदळ येथे बारेवाडीतील असलेल्या डोंगर कपारीतील  धबधब्याचे  दूरवर असलेल्या ओणी- अणुस्कुरा या मार्गावरून  दर्शन होते. ओणी- अणुस्कुरा मार्गावर सौंदळमधून त्या धबधब्याकडे पायवाटेने जाताना जवळपास दहा ते पंधरा मिनिटे लागतात. पुढे गेल्यावर उंचावरून मोठ्या आवाजात खाली कोसळणारा पाण्याचा प्रवाह आपोआपच खेचून घेतो. इथे त्या मानाने पर्यटकांची वर्दळ कमी आहे.
ठिकाण : मुंबई- गोवा महामार्गावरील ओणी या गावापासून सुमारे १० किमी अंतरावर सौंदळ या गावाजवळ हा धबधबा आहे.
कसे जाल : राजापूरमधून सौंदळपर्यंत एस.टी. बस, खासगी गाडीने जाता येते.

चुनाकोळवणचा सवतकडा

मुंबई- गोवा महामार्गावर तिवंदामाळ (ता. राजापूर) येथून चुनाकोळवणच्या सवतकडा धबधब्याकडे रस्ता जातो. तेथून पाच कि.मी. अंतरावर चुनाकोळवण हे गाव आहे. तेथे वरच्या बाजूला गाडी लावून थोडेसे खाली निसर्गरम्य वातावरणातून चालत गेल्यानंतर हा धबधबा लागतो. अतिशय भान हरपून टाकणारा हा प्रपात खिळवून ठेवतो आणि सारं काही विसरायला लावतो. मंदरूळ, वाटुळ, चुनाकोळवण परिसरात रांगोळीचा दगड मोठ्या प्रमाणात आहे. स्लेट टाइप दगडामुळे, दगडाचे वेगवेगळे टप्पे तयार होतात, त्यावरून पडणारे पाणी आणि त्याचे सौंदर्य बघून आपण परदेशात तर नाही ना असे वाटावे असे अद्भूत सौंदर्य याठिकाणी आहे. हा संपूर्ण भाग डोंगर- दऱ्यांचा असल्याने एकाच ओढ्यावर तीन-चार ठिकाणी छोटे- मोठे धबधबे आढळतात. मागील दहा- बारा  वर्षात या धबधब्यावर पर्यटकांचा ओढा वाढत असून अगदी पश्चिम महाराष्ट्रासह जिल्ह्याच्या विविध ठिकाणांवरून पर्यटक स्नानाचा आनंद लुटण्यासाठी येतात. म्हणूनच हा धबधबा सर्वांचे खास आकर्षण आहे.
ठिकाण : राजापूर शहरापासून २० किलोमीटर
कसे जाल : चुनाकोळवणपर्यंत एस.टी. बस, खासगी गाडीने जाता येते.

कोंढेतडचा जितावणे धबधबा
मुंबई- गोवा महामार्गावर कोंढेतड परिसरात वाहणारा जितावणे धबधबा पर्यटकांसह प्रवाशांचे लक्ष वेधून घेतो. महामार्गाच्या लगतच गंगातिठ्याजवळ हा धबधबा आहे. अतिशय सुरक्षित आणि राजापूर शहरापासून एक किलोमीटरच्या अंतरावर असणारा हा धबधबा अनेकांचे लक्ष वेधून घेतो.
ठिकाण : राजापूरपासून एक किलोमीटरवर.
कसे जाल : खासगी वाहन, रिक्षा

काजिर्डा पडसाळी धबधबा
राजापूर तालुक्याच्या जामदाखोरे परिसरातील काजिर्डा गावातील धबधबा सर्वात मोठा आहे. काजिर्डा गावात प्रवेश केला की लांबून त्याचे दर्शन होते. विशेष म्हणजे, हा धबधबा मार्च, एप्रिलपर्यंत प्रवाहित असतो. अगदी मे महिन्यातही त्याचा क्षीण झालेला प्रवाह पाहावयास मिळतो. या धबधब्याच्या पाण्यावर काजिर्डा परिसरातील लोक उन्हाळी पिके घेतात. लगतच वाहणाऱ्या जामदा नदीमध्ये त्याचा प्रवाह पुढे सरकतो. मात्र, या धबधब्याकडे जाताना खूप पायपीट करावी लागते.
ठिकाण : राजापूर तालुक्यातील पाचल बाजारपेठेपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर हा धबधबा आहे.
कसे जाल : काजिर्डा गावापर्यंत जाण्यासाठी एस.टी. बस आहेत. तेथून पायी जावे लागले.

Web Title: Rajapur taluka of magnificent waterfalls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.