राजापुरातील अख्खं कृ षी कार्यालयच बनलं लग्नाचं वऱ्हाडी !
By admin | Published: November 19, 2014 09:01 PM2014-11-19T21:01:52+5:302014-11-20T00:00:39+5:30
व्यक्तीच्या लग्नासाठी एखाद्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत कामावर दांडी मारुन उपस्थित राहण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी
राजापूर : ‘चला हो चला... तुम्ही लग्नाला चला... कामधंदे सोडून तुम्ही लग्नाला चला’ अशा अविर्भावात राजापूर तालुका कृषी कार्यालयातील बहुतांश अधिकारी व कर्मचारी चक्क एका लग्नाला गेल्याने कार्यालयात बुधवारी शुकशुकाट होता. तालुक्याच्या विविध भागातून आलेल्या जनतेला हे वऱ्हाडी परत केव्हा येणार याच्या प्रतीक्षा करीत दिवसभर ताटकळत थांबावे लागले. त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत होता. कुणा व्यक्तीच्या लग्नासाठी एखाद्या कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत कामावर दांडी मारुन उपस्थित राहण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी. दोन गाड्या खचाखच भरुन कृ षी कार्यालयातील अनेकजण लग्नाला निघून गेले. कार्यालयात एक-दोघांचा अपवाद वगळता दिवसभरात अनेकजण आपल्या विविध कामासाठी तालुका कृषी कार्यालयात येत होते. दिवसभर तालुक्यातील जनतेची वर्दळ सुरु होती. मात्र, त्यांना समर्पक उत्तरे मिळत नव्हती आणि त्यांचे कामही होत नव्हते. कारण कार्यालयात कोणी जबाबदारच उपस्थित नव्हते. परिणामी कामानिमित्त आलेल्या जनतेच्या संतापाचा पारा चढत होता.
याबाबत कुणीतरी पत्रकारांना ही माहिती दिली. त्यानंतर काही पत्रकारांनी थेट कार्यालयात संपर्क साधून याची खातरजमा करण्याचा प्रयत्न सुरु केला. पण, त्यानाही ताकास तूर लागू दिली गेली नाही. आपले काही अधिकारी व कर्मचारी फिल्ड वर्कवर आहेत, अशी मजेशीर उत्तरे देण्याचा प्रयत्न झाला. काही पत्रकारांनी तालुका कृषी अधिकारी चंद्रमणी मेश्राम यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेदेखील नॉट रिचेबल मिळत होते. त्यामुळे हे काय गौडबंगाल आहे हे शेवटपर्यंत कळू शकले नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कृषी कार्यालयातील सर्व कर्मचारी नक्की कोणाच्या लग्नासाठी गेला होते, त्याचाही थांगपत्ता लागत नव्हता.
दिवसभर याचीच चर्चा सुरु होती. शहरातील एका टोकाला हे कार्यालय अनेक वर्षे असून, त्याचा गैरफायदा या कर्मचारी अधिकाऱ्यांनी उचलला की काय, अशाही शंका उपस्थित करण्यात येत आहे. याबाबत सखोल चौकशी व्हावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता राजापूर तालुक्यातून जोर धरू लागली आहे. (प्रतिनिधी)
कार्यालयात दिवसभर शुकशुकाट.
दिवसभर आलेल्या जनतेच्या कामाचा झाला खोळंबा.
राजापुरातील एका टोकाला कार्यालय असल्याचा अधिकाऱ्यांनी उचलला फायदा?
सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी.
कार्यालयाला दांडी मारुन अधिकाऱ्यांनी केली विवाहासाठी सैर.