राजापूरची उद्याने स्वच्छतेच्या प्रतीक्षेत

By admin | Published: November 3, 2014 09:54 PM2014-11-03T21:54:18+5:302014-11-03T23:25:59+5:30

उद्यानांचा प्रश्न : नगरपरिषद लक्ष देत नसल्याने नाराजी

Rajapur's gardens awaiting cleanliness | राजापूरची उद्याने स्वच्छतेच्या प्रतीक्षेत

राजापूरची उद्याने स्वच्छतेच्या प्रतीक्षेत

Next

राजापूर : राजापूर शहरात असणारी बालोद्याने व पिकनिक स्पॉट विकासाबरोबरच स्वच्छतेच्या प्रतीक्षेत असून, गेल्या दोन वर्षांत यावर खर्च झालेले लाखो रुपये पाण्यात गेले आहेत. राजापूर नगरपरिषदेने गेल्या दोन वर्षांच्या काळात शहरातील कै. भिकाजीराव चव्हाण बालोद्यान, कोंढेतड येथील महंमदसाहेब बालोद्यानावर तसेच रानतळे येथील पिकनिक स्पॉटवर लाखो रुपये खर्च केले असले तरी आज या उद्यानांची अवस्था बिकट आहे.
शहरातून वाहणाऱ्या अर्जुना व कोदवली नदी पात्रात कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे संकेत देणारी राजापूर नगर परिषद स्वच्छतेच्या बाबतीत स्वत:च मोठ्या प्रमाणावर उदासिन आहे. शहरात असणारी उद्याने व पिकनिक स्पॉट सद्यस्थितीत कचऱ्याची आगारे बनली आहेत. रानतळे येथील पिकनिक स्पॉट तर गेले अनेक महिने साफ न केल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात कचरा साठला आहे. त्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कारंज्यामध्ये पाण्याचा तुटवडा व त्याच्या स्वच्छतेचा अभाव यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. परिणामी या पिकनिक स्पॉटकडे शहरवासीयांनी पाठ फिरवली आहे.
तसेच शहरातील साई मंदिरजवळील कै. भिकाजीराव चव्हाण बालोद्यान व कोंढेतड येथील महमदशेठ बालोद्यानावर गेल्या दोन वर्षांत राजापूर नगर परिषदेने सुशोभिकरणासाठी लाखो रुपये खर्च केले. मात्र, तेथील स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही उद्याने लहान मुलांसाठी धोकादायक ठरताना दिसत आहेत. या दोन्ही उद्यांनावर नगर परिषदेने खरोखरच सुशोभिकरणासाठी खर्च केला का, असा प्रश्न या उद्यानांमध्ये गेल्यावर पडल्यावाचून राहात नाही. गेल्या दोन वर्षांच्या काळात या उद्यानांवर खर्च झालेले लाखो रुपये नेमके कशावर खर्च झाले, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला असून, नगर परिषदेने जनतेचा पैसा स्वत:च्या फायद्यासाठीच वापरल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात येत आहे.
एकीकडे शासनाकडून आलेला निधी खर्ची घालायला पाहिजे म्हणून खर्च करायचा. त्यातून आपले अर्थपूर्ण व्यवहार साधायचे, असा नवा फंडा राजापूरकरांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्राथमिक गरजांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. सद्यस्थितीत शहरातील सार्वजनिक स्वच्छता धोक्यात आली असून, शहरातील उद्याने व पिकनिक स्पॉट अस्वच्छतेच्या विळख्यात सापडलेले आहेत. उद्यानांना नगर परिषदेने स्वच्छतेचा साज चढवून ती खुली करावीत, अशी मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Rajapur's gardens awaiting cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.