राजापूरची नवीन पूरररेषा शहरवासीयांसाठी ठरणार डाेकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:21 AM2021-07-04T04:21:56+5:302021-07-04T04:21:56+5:30
राजापूर : प्रतिकूल भौगोलिक रचनेमुळे राजापूर शहराचा विकास रखडला असताना त्यात जाचक पूररेषेची भर पडली आहे. गेली ३८ ...
राजापूर : प्रतिकूल भौगोलिक रचनेमुळे राजापूर शहराचा विकास रखडला असताना त्यात जाचक पूररेषेची भर पडली आहे. गेली ३८ वर्षे राजापूरवासीयांची डोकेदुखी बनलेली ही पूररेषा आणि त्यातील निर्बंध काढून टाकण्यात यावे, अशी मागणी होत असताना शासनाच्या पाटबंधारे विभागाने परस्पर नव्याने बदल करून आखलेल्या पूररेषेत नव्याने अधिकचे क्षेत्र समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पूररेषेमुळे अगोदरच त्रस्त असलेल्या नागरिकांच्या अडचणीत वाढ होणार असून त्याचा प्रतिकूल परिणाम शहर विकासावर होणार आहे.
सन २००८ साली करण्यात आलेल्या शहर विकास आराखड्यात राजापूर शहराची पूररेषा निश्चित करण्यात आली आहे. परंतु, सहायक अधीक्षक अभियंता रत्नागिरी पाटबंधारे मंडळ रत्नागिरी यांच्यातर्फे नव्याने बदल करून सुधारित पूररेषा वेबसाईटवर प्रसद्ध केली आहे. पूररेषा सुधारित करताना नगर परिषदेला कोणतीही कल्पना देण्यात आलेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना न जुमानता पाटबंधारे विभागाने ही नव्याने पूररेषा आखण्याचे नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नव्याने आखण्यात आलेल्या या पूररेषेत ज्या क्षेत्रामध्ये कधीही पूर आलेला नाही असे बरेचसे क्षेत्र प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पाहणी न करता पूररेषेमध्ये दर्शविण्यात आले आहे. सन २००८ च्या पूररेषेनुसार रहिवास क्षेत्रात समाविष्ट असलेल्या व आता सुधारित पूररेषेनुसार पूररेषेत येत असलेल्या रहिवाशांना विनाकारण त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. ही पूररेषा निश्चित करताना प्रत्यक्ष साईटवर न येता गुगल मॅपवरून निश्चित केल्याचे सांगितले जात आहे. पूररेषेमुळे अगोदरच शहराचा विकास खुंटलेला असताना या नव्या पूररेषेची अंमलबजावणी झाल्यास शहराच्या विकासावर बंधने येणार असून या पूररेषेच्या जाचक निर्बंधात नागरिक भरडले जाणार आहेत.
या नव्याने आखण्यात आलेल्या पूररेषेत भटाळीतील आयसीआयसीआय बँक परिसर, हॉटेल संतोष, डॉ. खलिफे हॉस्पिटल, कोकण बँक, राजकिरण नॉव्हेल्टी, तर मुन्शी नाका परिसरातून दोस्ती मेडिकलपर्यंतचा भाग या रेषेत नव्याने समाविष्ट करण्यात आला आहे. जाचक निर्बंधामुळे नागरिकांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असताना त्यात नव्या नागरिकांची भर पडणार आहे, तर या भागात बांधकामांना परवानगी देता येत नसल्याने नगर परिषदेच्या कर उत्पन्नावरही त्याचा परिणाम होत आहे. शहराच्या एकूणच विकास प्रक्रियेतही ही पूररेषा अडचणीची ठरत आहे.