राजापूरच्या महावितरण कार्यालयावर धडक
By admin | Published: July 8, 2017 05:59 PM2017-07-08T17:59:07+5:302017-07-08T17:59:07+5:30
भालावली परिसरात विजेचा खेळखंडोबा
आॅनलाईन लोकमत
राजापूर (जि. रत्नागिरी), दि. ८ : तालुक्यातील भालावली पंचायत समिती गणांतर्गत अनेक गावांमध्ये मागील काही दिवस सातत्याने विजेचा खेळखंडोबा सुरु असल्याने ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. याबाबत भालावलीचे पंचायत समिती सदस्य अभिजीत तेली यांनी राजापूर महावितरण कार्यालयात जात संबधित अधिकाऱ्यांची भेट घेताना यापुढे वीजपुरवठा सुरळीत व्हावा, अशी मागणी केली.
कोदवली परिसरातील भालावली, देवीहसोळ, कोतापूर, पेंडखळे, भू, तेरवण, खिणगिणी, दसूर व लगतच्या आडिवरे भागात वीज खंडित होण्याचे प्रकार सातत्याने सुरु असून, त्याचा फटका परिसरातील जनतेला बसत आहे. वारंवार वीज गायब होत असल्याने शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. भातशेतीसाठी विद्युत पंपांचा वापरही यामुळे करता येत नसून, संपर्काच्या दृष्टीनेदेखील अडथळे येत आहेत. मोबाईल चार्जिंग होत नसल्याने अन्यत्र संपर्क साधता येणे अशक्य बनले आहे. विजेच्या या सततच्या खेळखंडोबामुळे भालावली परिसरातील जनता त्रस्त झाली असून, जनतेने अडचणी पंचायत समिती सदस्य अभिजीत तेली यांच्याकडे मांडल्या. त्यानंतर अभिजीत तेली यांच्यासह यशवंत नेमण, रवी पाध्ये, सदानंद उर्फ नाना चव्हाण तसेच अन्य काही ग्रामस्थांनी तडक राजापूर महावितरण कार्यालय गाठले. त्यावेळी घवाळी नामक अधिकारी तेथे कार्यरत होते. त्यांच्याकडे तेली यांनी परिसरातील वीजसमस्या मांडली.
तसेच तत्काळ परिसरातील विद्युत व्यवस्थेतील बिघाड दूर करावा, अशी मागणीही तेली यांनी केली आहे. भालावलीतील वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत महावितरण कशाप्रकारे पावले उचलते, त्याकडे भालावली परिसरातील ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.