राजापूरचा टँकर भागवताेय लांजाची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:29 AM2021-04-13T04:29:46+5:302021-04-13T04:29:46+5:30

राजापूर : सुमारे तीन वर्षांपूर्वी लांजा तालुक्याला दिलेला टँकर अद्यापही राजापूर पंचायत समितीच्या ...

Rajapur's tanker quenches thirst | राजापूरचा टँकर भागवताेय लांजाची तहान

राजापूरचा टँकर भागवताेय लांजाची तहान

Next

राजापूर : सुमारे तीन वर्षांपूर्वी लांजा तालुक्याला दिलेला टँकर अद्यापही राजापूर पंचायत समितीच्या ताब्यात न मिळाल्याने तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करताना पंचायत समितीला अडचणींचा सामना करावा लागणार आहे. सद्यस्थितीत केवळ एकाच गावाने टँकरची मागणी केली आहे. पुढील काही दिवसांमध्ये टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत वाढ झाल्यास पाणीपुरवठा करण्यासाठी खासगी टँकरचा आधार घ्यावा लागणार आहे.

राजापूर आणि पाणीटंचाई हे जवळजवळ एक समीकरणच बनले आहे. राजापूर पंचायत समितीकडे एक शासकीय मालकीचा टँकर आहे. मात्र, दरवर्षी टंचाईग्रस्त गावांची संख्या पाहता एक टँकर अपुरा पडत असल्याने प्रशासनाला खासगी टँकर अधिग्रहित करावे लागतात. मात्र, शासनाकडून खासगी टँकर मालकांना अत्यल्प भाडे मिळत असल्याने व तेही वेळेत मिळत नसल्याने खासगी टँकर मालक प्रशासनाला वाहन देण्यास टाळाटाळ करत असल्याचे वास्तव आहे. तीन वर्षांपूर्वी राजापूर पंचायत समितीचा शासकीय टँकर लांजा तालुक्यासाठी देण्यात आला होता. तो आजपर्यंत राजापूर पंचायत समितीला प्राप्त न झाल्याने गेली दोन वर्षे टंचाईग्रस्त गावांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागले होते.

यावर्षी प्रशासनाने ८३ गावांतील २४४ वाड्यांचा समावेश असलेला सुमारे २० कोटी रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला आहे. यामध्ये काही संभाव्य टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठ्याच्या उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. तर काही गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सद्यस्थितीत एका गावाने टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. मात्र, लांजा तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठ्यासाठी दिलेला टँकरही तालुका पंचायत समितीला परत मिळालेला नाही. टँकर परत मिळावा म्हणून पंचायत समितीच्या बैठकीत ठरावही करण्यात आला आहे. मात्र, त्याला संबंधितांकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत.

त्यामुळे यावर्षी तरी टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा होणार का, शासकीय टँकर उपलब्ध न झाल्यास प्रशासन खासगी टँकरचा आधार घेणार का, पाण्यासाठी यावर्षीही वणवण भटकावे लागणार, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

चाैकट

गेली वर्षानुवर्षे राजापूर तालुका पाणीटंचाईच्या समस्येसोबत झगडत आहे. पाणीटंचाई दूर करण्यासाठी दरवर्षी नवनवीन योजना, आराखडे तयार होत आहेत. मात्र, तालुका टंचाईमुक्त करण्यात अद्यापही यश आलेले नाही. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, नाले उन्हाळ्यात मात्र ठणठणीत कोरडे पडतात. त्यामुळे मार्च महिन्यापासून तालुकावासीयांची पाण्यासाठी भटकंती सुरू होते. हंडाभर पाण्यासाठी डोंगरदऱ्यातून, दीड-दोन किलोमीटरची पायपीट करावी लागते. अशा टंचाईग्रस्त गावांना तालुका पंचायत समितीकडून मग टँकरने पाणीपुरवठा केला जातो.

Web Title: Rajapur's tanker quenches thirst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.