स्वच्छतादूत असणाऱ्या मनोरुग्णांना ‘राजरत्न’ने दिला मायेचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:21 AM2021-06-11T04:21:35+5:302021-06-11T04:21:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आरवली : ऊन, वारा, पाऊस आणि थंडी या कशाचीही तमा न बाळगता गेली सहा वर्षे ...

Rajaratna gave a hand of love to the mentally ill who are sanitation ambassadors | स्वच्छतादूत असणाऱ्या मनोरुग्णांना ‘राजरत्न’ने दिला मायेचा हात

स्वच्छतादूत असणाऱ्या मनोरुग्णांना ‘राजरत्न’ने दिला मायेचा हात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

आरवली : ऊन, वारा, पाऊस आणि थंडी या कशाचीही तमा न बाळगता गेली सहा वर्षे संगमेश्वर आणि माभळे परिसरात महामार्गाच्या बाजूला असणारा कचरा एकत्र करुन परिसराची स्वच्छता करणाऱ्या एका वयोवृध्द मनोरुग्णाला आणि महामार्गावर टाकल्या जाणाऱ्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या गोळा करुन जणू ‘पर्यावरण वाचवा’ असा संदेश देणाऱ्या मनोरुग्ण महिलेला रत्नागिरी येथील राजरत्न प्रतिष्ठानने संगमेश्वर येथे येऊन ताब्यात घेतले आणि त्यांना मायेचा हात देत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन मनोरुग्णालयात भरती केले.

‘संगमेश्वरनजीकच्या माभळे येथे एक महिला महामार्गालगत स्वतःचे जेवण करुन जेवते. या मनोरुग्ण महिलेला पुढील दोन दिवसात होणाऱ्या अतिवृष्टीत धोका निर्माण होऊ शकतो’. अशा आशयाची एक पोस्ट छायाचित्रासह रामपेठ संगमेश्वर येथील अमोल शेट्ये यांनी सोशल मीडियावर केली होती. ही पोस्ट माभळे पुनर्वसन येथील अमित सामंत यांनी पाहिली आणि त्यांनी लगेचच मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या रत्नागिरीच्या राजरत्न प्रतिष्ठान या संस्थेच्या सचिन शिंदे यांच्याशी संपर्क साधला. शिंदे यांनी आपल्या टीमसह संगमेश्वर येथे येण्याचे मान्य केले.

साधारण ४० वर्षे वयाची एक महिला संगमेश्वरमध्ये चार महिन्यांपूर्वी दाखल झाली. ती माभळे येथून रत्नागिरीच्या दिशेने बावनदीपर्यंत तर चिपळूणच्या दिशेने सावर्डेपर्यंत जाऊन प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या गोणपाटात भरुन आणायची. मनोरुग्ण असूनही ती पर्यावरण वाचविण्याचा संदेश आपल्या कामातून देत होती. एकत्र केलेल्या सर्व बाटल्या ती भंगारात विकून स्वतःचा उदरनिर्वाह करत होती. माभळे येथे साधना बेंडके यांच्या हॉटेलमध्ये जाऊन रोज चहा, पाव आणि दूध अशा वस्तू ती पैसे देऊन घ्यायची.

सुमारे सहा वर्षांपूर्वी संगमेश्वरमध्ये एक ६० वर्षे वयाचा वृध्द मनोरुग्ण आला. त्याचा कोणालाही त्रास नसल्याने तो माभळे आणि संगमेश्वर असा फिरत असला तरी त्याला कोणी ना कोणी खायला, प्यायला देत असतं. या वृध्द मनोरुग्णाला महामार्गालगतचा परिसर स्वच्छ करणे ही एकच आवड. माभळे संगमेश्वरवासीयांना या वृध्दाचा त्याच्या स्वच्छतेच्या कामासह स्वभावामुळे लळा लागला आणि त्याचे ‘राजाभाऊ’ असे नामकरणही झाले. राजाभाऊ असोत अथवा ती महिला दोघेही माभळे - संगमेश्वरमधील ‘स्वच्छतादूत’ होते. दोघांना जे काही खायला मिळेल त्यातील थोडा हिस्सा ते भटक्या श्वानांना घालत. त्यामुळे या दोघांच्या आजूबाजूला सात - आठ श्वान जणू त्यांच्या संरक्षणासाठीच कायम उभे असायचे.

‘राजरत्न’चे सचिन शिंदे आपले सहकारी सौरभ मुळ्ये, जया डावर यांच्यासह या दोघांना ताब्यात घेण्यासाठी माभळे संगमेश्वर येथे दाखल झाले. त्यावेळीही शेवटच्या भेटीसाठी पाच - सहा श्वान या दोन्ही मनोरुग्णांभोवती जमा झाले होते. यावेळी अमित सामंत, अमोल शेट्ये, अविनाश सप्रे, दीपक भोसले, उद्योजक दीपक भिडे, साधना बेंडके, प्रशांत दळी, किशोर प्रसादे आदी मदतीसाठी उपस्थित होते. राजरत्न प्रतिष्ठानचे हे कार्य पाहून उद्योजक दीपक भिडे यांनी ‘राजरत्न’च्या सचिन शिंदे यांच्याकडे आर्थिक मदत सुपूर्द केली. दोन्ही मनोरुग्णांना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन मनोरुग्णालयात भरती करुन त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.

-------------------

अश्रूही अनावर

ज्यांचे ‘राजाभाऊ’ असे नामकरण झाले त्या वृध्द मनोरुग्णाला घरच्या माणसाप्रमाणे माभळे येथील हॉटेलचालिका साधना बेंडके या गेली सहा वर्षे दररोज न चुकता चहा-नाष्टा देत होत्या, त्याच्याशी संवाद साधत होत्या. महिला मनोरुग्णही बेंडके यांच्या हॉटेलसमोर असल्याने गेल्या चार महिन्यांत तीदेखील त्यांच्याशी एका अनामिक नात्याने जोडली गेली होती. ‘राजरत्न’ने दोघांनाही मनोरुग्णालयात भरती करण्यासाठी गाडीत बसवल्यानंतर साधना बेंडके यांना अश्रू अनावर झाले.

Web Title: Rajaratna gave a hand of love to the mentally ill who are sanitation ambassadors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.