खेडमध्ये शासकीय जागांवर राजरोस अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:35 AM2021-08-28T04:35:44+5:302021-08-28T04:35:44+5:30
खेड : शहरातील विविध भागांत राजरोसपणे रस्त्यांच्यालगत शासकीय जागांवर अतिक्रमण सुरू असून, गेल्या काही महिन्यांत तापलेले खोक्यांचे ...
खेड : शहरातील विविध भागांत राजरोसपणे रस्त्यांच्यालगत शासकीय जागांवर अतिक्रमण सुरू असून, गेल्या काही महिन्यांत तापलेले खोक्यांचे राजकारण मात्र थंड झाले आहे. खेड शहरात व बाजरपेठेत रातोरात मोक्याच्या जागा हेरून उभे राहणारे खोके व पूर्वीपासून उभ्या असलेल्या खोक्यांचा वाढणारा विस्तार याकडे प्रशासन व शहराचे स्थानिक कारभारी मात्र डोळेझाक करत अतिक्रमणाला पाठीशी घालत आहेत.
खेड पालिका व तालुका निष्क्रिय प्रशासनाच्या गलितगात्र अवस्थेचा गैरफायदा घेत शहरात सध्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या वरदहस्ताने सरकारी जागेवर अतिक्रमणाचा विळखा पडत आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय कार्यकर्त्यांच्या पदरात दान टाकण्यात येत असल्याची चर्चा सुरू आहे. शहरात मोक्याच्या जागा हेरून रातोरात खोके उभे राहत आहेत. बुधवारी रात्री शहरातील मध्यवर्ती परिसरात बसस्थानकामागे सुपरमार्केटमध्ये तब्बल ४ खोकी उभी राहिली. गेल्या पंधरा दिवसांत याठिकाणी ७ खोकी उभी राहिली आहेत. या खोक्यांनी सुपर मार्केटमध्ये रस्ता अरुंद झाला असून, आता वाहने उभी करण्यासाठीदेखील जागा शिल्लक राहिलेली नाही.
खेडचे तत्कालीन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी त्यांच्या कारकीर्दीत शिवसेनेच्या तक्रारीनंतर शहरातील काही अनधिकृत खोक्यांवर कारवाई सुरू केली होती. सरकारी जागांवरील अतिक्रमण हटवण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न औटघटकेचा ठरला. त्यांच्या बदलीनंतर खोके उभारण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. नगर प्रशासन या अतिक्रमणांबाबत अनभिज्ञ असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरातील अतिक्रमण हटवण्यासाठी तत्कालीन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी यापूर्वी पुढाकार घेतला होता. मुख्याधिकाऱ्यांच्या कारवाईनंतर लोकप्रतिनिधी व प्रशासनातील संघर्ष शिगेला पोहोचला होता. सरकारी जागा हडप करणाऱ्या अनेक खोकेधारकांनी नगर परिषदेवर धडक देऊन प्रशासनाला नमवले होते. खोकेधारकांच्या आक्रमकतेनंतर मोहिमेतील हवाच निघून गेली होती. प्रशासनाची गलितगात्र अवस्था झाल्यानंतर शहरात एकीकडे अनधिकृत खोकी उभे राहत असताना दुसरीकडे मात्र लोकप्रतिनिधींनी हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवल्याचे दिसत आहे.
--------------------
अधिकृत व्यापारी संकुल रिकामी
खेडमध्ये एका बाजूला पालिका व महसूल प्रशासनाची रितसर परवानगी घेऊन उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलात अनेक व्यापारी गाळे रिकामे आहेत, तर दुसऱ्या बाजूला पालिकेच्या व्यापारी संकुलातदेखील अनेक गाळे रिकामे आहेत. प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी ठरवले तर अधिकृत व्यापाराला चालना देऊन शहरातील आर्थिक उलाढाल वाढवून शहराच्या विकासाला गती देऊ शकतात. परंतु त्या विपरित शहराला भकास करून बकाल बनवण्याचा विडा उचलल्याप्रमाणे सर्वच वागताना दिसत असल्याची खंत नागरिक व्यक्त करत आहेत.