राजेश सावंत भाजपच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:06 AM2017-08-22T00:06:08+5:302017-08-22T00:06:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : रत्नागिरीतील शिवसेनेचे उपनगराध्यक्ष राजेश सावंत तसेच राष्टÑवादी कॉँग्रेसचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये अनेक समर्थकांसह येत्या काही दिवसात भाजपमध्ये डेरेदाखल होणार असल्याच्या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. सेना व राष्टÑवादीतील अन्य मंडळीही भाजपमध्ये दाखल होण्याच्या तयारीत आहेत. आता केवळ मुहूर्ताची प्रतीक्षा असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे रत्नागिरीत येत्या काही दिवसात राजकीय भूकंपाची शक्यता आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपचे पुरते पानिपत झाले आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील भाजप भक्कम करण्यासाठी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांना पक्षाध्यक्ष अमित शहा व प्रदेश भाजपकडून आवश्यक पावले उचलण्यास सांगण्यात आले. दोन दिवसांपूर्वीच दिलेल्या या सूचनेनुसार २१ आॅगस्टला चिपळूणमध्ये झालेल्या भाजपच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत चिपळूण व संगमेश्वर तालुका भाजप अध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली आहे. एकीकडे नेते व कार्यकर्त्यांची भाजपला गरज आहे, तर सेना व राष्टÑवादीत समाधानी नसलेल्या काही नेत्यांना व कार्यकर्त्यांना भाजपमध्ये जाण्याची घाई आहे.
राजेश सावंत हे सध्या रत्नागिरीचे उपनगराध्यक्ष आहेत. त्यांना हे पद केवळ एका वर्षासाठी देण्यात आले आहे. त्यामुळे ते नाराज असल्याचे सांगण्यात येते. सामंत यांच्याबरोबर राहून राजेश सावंत यांचा राजकीयदृष्ट्या काहीच फायदा झाला नसल्याची भावना सावंत यांच्या समर्थकांमध्ये आहे. सातत्याने सावंत यांचे नेतृत्व चेपण्याचाच प्रयत्न झाल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळेच राजेश सावंत यांनी सेनेतून बाहेर पडावे व भाजपमध्ये प्रवेश करावा, ही त्यांच्या समर्थकांची भूमिका आहे. त्यातूनच राजेश सावंत यांचा भाजप प्रवेशाचा मुद्दा पुढे आला आहे.
दुसरीकडे राष्टÑवादीचे माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये यांनी त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात शहरात अनेक विकासकामे केली आहेत. रत्नागिरी शहराला चांगले रुप देण्याचा पहिला प्रयत्न त्यांनी केला आहे, अशी नागरिकांची भावना आहे. राष्टÑवादी कॉँग्रेस पक्ष रत्नागिरी तालुक्यात काहीसा कमकुवत झाला आहे. त्यामुळे भाजपमध्ये गेल्यास आपल्या कर्तृत्त्वाला पुन्हा झळाळी मिळेल, अशी चर्चा शेट्ये यांच्या गोटात सुरू आहे. भाजपमध्ये आणखी कोण जाणार, याचीही चर्चा आहे.