"पायातील हातात घेऊन जाब विचारायची वेळ आली", राजू शेट्टींचा सरकारला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 04:42 PM2021-12-10T16:42:52+5:302021-12-10T17:19:12+5:30
चिपळूण बचाव समितीच्या उपोषणाला राजू शेट्टींचा पाठिंबा. गेल्या पाच दिवसापासून प्रांत कार्यालया समोर सुरू आहे उपोषण.
चिपळूण : महापूराच्या आपत्तीनंतर पुरग्रस्तांना मदत करताना हात आखडता घेतला जातो. मात्र राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपुरात सरकारचा प्रचंड पैसा खर्च केला जातो. तिथे शासकीय निधीची कमतरता भासत नाही. चिपळूणच्या गाळ उपशासाठी मात्र लोकांना उपोषण करावे लागते हे दुर्देव आहे. सरकारला आता पायातील हातात घेऊन जाब विचारायची वेळ आली असल्याचे मत व्यक्त करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारला इशारा दिला. यावेळी त्यांनी उपोषण कर्त्यांना मार्गदर्शन केले.
वाशिष्ठी आणि शिवनदीतील गाळ काढावा, लाल व निळी पुररेषा रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या पाच दिवसापासून प्रांत कार्यालया समोर उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी उपोषणकर्त्यांना भेट दिली.
चिपळूण बचाव समितीचे अरूण भोजने, सतीश कदम, बापू काणे, शिरीष काटकर यांनी उपोषणामागील हेतू स्पष्ट केला. चिपळूणला महापूराचा कसा तडाखा बसला, शहर व परिसरात महापूराच्यावेळी कशी परिस्थिती होती, त्याचे कथन केले. गेल्या ५० वर्षात शासनाने गाळ काढला नाही. आता गाळ काढल्याशिवाय पर्याय नाही. गाळ निघत नसल्याचे लोकांना उपोषण करावे लागते आहे.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले, सांगली, कोल्हापूरसह चिपळूणलाही महापूराचा तडाखा बसला. पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत चिपळूणकरांचे मोठे नुकसान झाले. न भरून येणारी हानी झाली, हे वास्तव आहे. २००५ मध्ये महापूरानंतर जशी शासनाकडून मदत झाली, तशी यावेळी झाली नाही. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आणि उपाययोजनेकडे केंद्र व राज्य सरकारकचे साफ दुर्लक्ष झाले आहे. हे नाकारता येणार नाही. या रार्ज्यकर्त्याना भ्रष्टाचार करायला पैसा आहे. मोठ-मोठ्या शहरावरच ते खर्च करतात. राज्यातील इतर भागात गावे, शहरे आहेत की नाहीत. कोरोनाचे कारण देऊन मदत देण्याचे टाळले जाते.
..माळरानावर शेती केल्यासारखेच
मात्र याच कोरोना कालावधीत शासनाने अव्वाच्या सव्वा दराने वस्तू खरेदी करून कोट्यावधीची माया मिळवली. याचे आपल्याकडे पुरावे आहेत. अनेक आमदार अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि विकास कामांच्या टक्केवारीत गुंतले आहेत. त्यांच्याकडून कसल्या अपेक्षा ठेवणार. त्यामुळे आता संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही. प्रशासनाकडून कामांची अपेक्षा ठेवायची म्हणजे माळरानावर शेती केल्यासारखेच आहे.
जनतेने परशुरामाचा अवतार घेऊन सहभागी व्हायला हवे
तापमान वाढीमुळे पर्यावरणाचा ह्राय झालाय. केव्हाही कधीही पाऊस पडतो. कमी कालावधीत जास्त पाऊस पडण्याचे प्रमाण वाढलंय. यापुढील कालावधीत असेच सुरू राहणार, त्याला पर्याय नाही. सरकारनेच याचे योग्य उत्तर शोधायला हवं. शांतपणे आंदोलन केले की त्याकडे लक्ष दिले जात नाही. राजकारण आणि द्वेश बाजूला ठेवून आंदोलन सुरू ठेवल्यास नक्कीच यश मिळेल. उपोषणाचा लढा जोमाने लढण्यासाठी जनतेने परशुरामाचा अवतार घेऊन यात सहभागी व्हायला हवे, असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.